समलैंगिक संबंध; कुणी केले स्वागत, कुणी म्हटले निर्णय चुकीचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2018 10:18 AM2018-09-07T10:18:24+5:302018-09-07T10:18:43+5:30
सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी अनैसर्गिक संबंधासंदर्भात दिलेल्या निर्णयावर शहरातील विधिज्ञांनी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. काहींनी निर्णयाचे स्वागत केले तर, काहींनी निर्णय चुकीचा ठरवला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी अनैसर्गिक संबंधासंदर्भात दिलेल्या निर्णयावर शहरातील विधिज्ञांनी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. काहींनी निर्णयाचे स्वागत केले तर, काहींनी निर्णय चुकीचा ठरवला. त्यापैकी निवडक प्रतिक्रिया पुढीलप्रमाणे.
निर्णय योग्य आहे
सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय योग्य आहे. आपण आतापर्यंत ‘इंटरनॅशनल डिक्लेरेशन’च्या विरोधात वागत होतो. ‘इंटरनॅशनल डिक्लेरेशन’मध्ये अनैसर्गिक संबंधाला मान्यता देण्यात आली आहे. तसेच, हा प्रत्येक व्यक्तीचा अधिकार असल्याचे स्वीकारण्यात आले आहे. अशावेळी भारतीय नागरिकांना सतत दहशतीत ठेवणे अमानवीय होते. हा निर्णय खूप आधी यायला हवा होता.
- अॅड. फिरदोस मिर्झा.
चुकीचा निर्णय आहे
सर्वोच्च न्यायालयाने चुकीचा निर्णय दिला. अनैसर्गिक संबंधाला मान्यता दिली जाऊ शकत नाही. अनैसर्गिक संबंध ठेवणे गुन्हा ठरविण्यात आला होता म्हणून असे प्रकार नियंत्रणात होते. परंतु, आता अनैसर्गिक संबंध ठेवणाऱ्यांची संख्या वाढण्याची भीती आहे. अशा घटना कारागृहामध्ये सर्वाधिक घडतात. त्याचा विचार व्हायला हवा होता. या निर्णयाचे दुष्परिणाम भविष्यात पहायला मिळतील.
- अॅड. शशिभूषण वाहणे.
निर्णय स्वागतार्ह आहे
सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय स्वागतार्ह आहे. या देशामध्ये सर्वांना सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. तसेच, प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. त्यामुळे दोन सज्ञान व्यक्तींनी सहमतीने ठेवलेले अनैसर्गिक संबंध गुन्हा ठरू शकत नाही. सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला आहे. आता सरकारने या निर्णयानुसार कायद्यामध्ये तातडीने आवश्यक बदल करून घ्यायला पाहिजे.
- अॅड. राजेंद्र डागा.