‘शरयू तीरी’ प्रथमच निनादले गदिमांचे शब्द अन् बाबूजींची भावस्पर्शी चाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2019 01:13 PM2019-08-21T13:13:27+5:302019-08-21T13:13:50+5:30
प्रत्यक्ष शरयू तीरावर वसलेल्या अयोध्यानगरीतील वासींना नागपूरकरांच्या तोंडून मूळ मराठी गीतशृंखलेतून रामायणाचा भावस्पर्शी अनुभव घेता आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गदिमांच्या (ग.दि. माडगूळकर) शब्दस्फुरणातून आणि बाबूजींच्या (सुधीर फडके) भावगायनातून कोट्यवधी रसिकांच्या मनात घर करून असलेल्या गीतरामायण या श्रीरामगीतशृंखलेला त्यांच्या उभ्या आयुष्यात कधीच अयोध्येची वारी घडविता आली नाही. त्यांच्या हृदयांतरीची ती सल काहीशी दूर करण्याची किमया त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या औचित्याने दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राने साधली आणि प्रत्यक्ष शरयू तीरावर वसलेल्या अयोध्यानगरीतील वासींना नागपूरकरांच्या तोंडून मूळ मराठी गीतशृंखलेतून रामायणाचा भावस्पर्शी अनुभव घेता आला.
उत्तर मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र-प्रयागराज, संस्कार भारती-अयोध्या आणि अयोध्या शोध संस्थान-अयोध्या यांच्यासोबतच दमक्षेने हा योग घडवून आणला. प्रत्यक्ष अयोध्येत गीतरामायण सादर करण्याची ही पहिलीच वेळ होती आणि त्यामुळेच त्याचे विशेष महत्त्व ठरते. यासाठी नागपुरातून ६० गायक-वादक-नर्तक-निवेदक आणि व्यवस्थापकांची चमू अयोध्येत गेली होती. त्यात नर्तक म्हणून छोटे बालगोपालही होते. सत्कार्यात जसे अनेक अडथळे असतात, तशाच अडथळ्यांचा सामना या चमूला करावा लागला, हे विशेष. म्हणावा तेवढा हा प्रवास सोपा नव्हता. ६० कलावंतांची चमू एकसाथ जेव्हा कुठल्याही अभियानाला निघते, तेव्हा त्याचे नियोजन अगदी तंतोतंत करवून घ्यावे लागते आणि तसे नियोजन दमक्षेतर्फे करण्यातही आले होते. मात्र, पडणारा पाऊस आणि येणाऱ्या समस्या, यांचा काही नेम नसतो... अगदी तसेच झाले. नागपूरहून राजधानी एक्स्प्रेसने निघालेल्या या चमूला दिल्ली ते अयोध्या ही ट्रेन रद्द झाल्याचे ऐनवेळी कळले. प्रसंगावधान साधत कसे तरी तात्काळ तिकिटे काढून वेळ निभावता आली आणि चमू अयोध्येला पोहोचली. ठरल्याप्रमाणे मराठी गीतरामायणाचा कार्यक्रम सादर झाला. या कार्यक्रमाला स्थानिकांनी प्रचंड दाद दिली आणि या संपूर्ण कार्यक्रमात मराठी गीतरामायण आणि हिंदी रसिकांमध्ये प्रमुख दुवा बनले ते नगरसेवक दयाशंकर तिवारी. प्रत्येक गीताची पार्श्वभूमी ते त्यांच्या निवेदनातून स्थानिकांना सांगत आणि त्यानंतर सादर होणाºया गीतामध्ये स्थानिक रसिक मंत्रमुग्ध होत. कार्यक्रम आटोपला आणि दिल्लीकडे निघण्याची वेळ आली तेव्हा ऐन वेळेवर कळले, अयोध्या ते दिल्ली ही ट्रेन रद्द झाली. विशेष म्हणजे, या ट्रेनच्याच भरवशावर दिल्ली ते नागपूरचा प्रवास निश्चित झाला होता. तब्बल ६० जणांचा गोतावळा सोबत असताना, प्रवासात निर्माण झालेले हे अडथळे प्रचंड मोठे असतात. ऐन वेळेला प्रवासाची दुसरी सोय कशी करावी, हा मोठा प्रश्न होता. कारण, दिल्ली ते नागपूर असलेल्या ट्रेनच्या वेळेपूर्वी पोहोचणे गरजेचे होते. अशात स्थानिक अयोध्या शोधसंस्थानच्या कार्यकर्त्यांनी प्रवासाची सोय करवून दिली. त्यासाठी जादाचे पैसे मोजावे लागले, हा वेगळा भाग. मात्र, प्रवास झाला आणि दिल्लीला वेळेत पोहोचणेही झाले. आणि हा संपूर्ण प्रवास अडथळ्यांसोबत पूर्ण झाला आणि गदिमा व बाबूजींना जन्मशताब्दीनिमित्त आदरांजलीही वाहता आली.
नितीन गडकरींच्या मेजवानीचा आनंद
या संपूर्ण चमूला दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरी मेजवानीचा आनंद घेता आला. संस्कार भारती, नागपूर अध्यक्ष कांचन गडकरी यांनी तशी तंबीच आयोजकांना दिली होती. येताना आणि जाताना कोणत्याही परिस्थितीत घरी येणे बंधनकारक केले होते. अर्थात हा जिव्हाळ्याचा भाग होता.
गीतरामायण अयोध्येत झाले, हे महत्त्वाचे
तसे पाहता केंद्राच्या इतर सांस्कृतिक कार्यक्रमांप्रमाणे हाही एक कार्यक्रम होता. मात्र, गदिमा आणि बाबूजींच्या जन्मशताब्दी वर्षात प्रथमच अयोध्येत गीतरामायण सादर झाले आणि त्याचे माध्यम दमक्षे ठरले, यापेक्षा वेगळे समाधान कुठलेच असू शकत नसल्याची भावना दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे संचालक डॉ. दीपक खिरवडकर यांनी व्यक्त केली.