विदर्भात ५१ ठिकाणी १५१ कार्यक्रमात गुंजणार गीतरामायण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2019 12:52 AM2019-04-05T00:52:37+5:302019-04-05T00:53:28+5:30
महाराष्ट्राचे वाल्मिकी म्हणून प्रसिद्ध असलेले कवी ग. दि. माडगुळकर आणि संगीतकार सुधीर फडके ऊर्फ बाबूजी यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे केले जात आहे. या दोघांनी ५० वर्षापूर्वी निर्मिलेले ‘गीतरामायण’म्हणजे महाराष्ट्राला दिलेला संस्कार ठेवा होय. हा ठेवा विदर्भाच्या घराघरात पोहोचविण्याचा प्रयत्न संस्कार भारतीच्या विदर्भ प्रांताने चालविला आहे. गदिमा व बाबूजी यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून गुढीपाडवा ते रामनवमी या काळात संस्कार भारतीतर्फे विदर्भात ५१ ठिकाणी नृत्य व नाट्यमय गीतरामायणाचे १५१ कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्राचे वाल्मिकी म्हणून प्रसिद्ध असलेले कवी ग. दि. माडगुळकर आणि संगीतकार सुधीर फडके ऊर्फ बाबूजी यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे केले जात आहे. या दोघांनी ५० वर्षापूर्वी निर्मिलेले ‘गीतरामायण’म्हणजे महाराष्ट्राला दिलेला संस्कार ठेवा होय. हा ठेवा विदर्भाच्या घराघरात पोहोचविण्याचा प्रयत्न संस्कार भारतीच्या विदर्भ प्रांताने चालविला आहे. गदिमा व बाबूजी यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून गुढीपाडवा ते रामनवमी या काळात संस्कार भारतीतर्फे विदर्भात ५१ ठिकाणी नृत्य व नाट्यमय गीतरामायणाचे १५१ कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.
६ ते १३ जुलै यादरम्यान होणाऱ्या या महायज्ञात विदर्भातील प्रथितयश आणि नवोदित अशा १००० गायक, वादक व नर्तक कलावंतांचा सहभाग राहणार असल्याची माहिती संस्कार भारतीच्या विदर्भ प्रांत अध्यक्ष डॉ. कमलताई भोंडे यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत दिली. महिला चमू, बाल चमू व अंध मुलांच्या एकूण १५ चमूंचा समावेश असेल. ६ एप्रिल रोजी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर श्रीरामनगर, पावनभूमी, सोमलवाडा येथे सकाळी ६ वाजता व्हायोलिनवादक सूरमणी प्रभाकर धाकडे, दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे संचालक डॉ. दीपक खिरवडकर यांच्या उपस्थितीत या महायज्ञाचा शुभारंभ होणार आहे. यादरम्यान म्हाळगीनगर, रामनगर, मानेवाडा रिंगरोड, रवींद्रनगर, चिंचभुवन, धंतोली गार्डन, त्रिमूर्तीनगर, श्रीराम मंदिर-जुना बाबुळखेडा येथेही गीतरामायणाचे कार्यक्रम होतील. १३ एप्रिलपर्यंत शहरात ५२ ठिकाणी हे कार्यक्रम होतील. ६ रोजी पश्चिम विदर्भात अमरावती येथूनही गीतरामायणाचा शुभारंभ होईल. गडचिरोलीच्या दुर्गम भागापर्यंत विदर्भाच्या ११ जिल्ह्यातील सर्व तालुक्यात हे कार्यक्रम होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पत्रपरिषदेत वीरेंद्र चांडक, संयोजक गजानन रानडे, गायक अमर कुळकर्णी, चंद्रकांत घरोटे, श्याम देशपांडे, प्रसाद पोफळी, अनिल शेंडे, स्वाती भालेराव व आशुतोष अडोणी उपस्थित होते.
४००० चौ.फुटात महारांगोळी
यादरम्यान सोमलवाड्याच्या बास्केटबॉल मैदानावर हिंदू नववर्षाला अभिवादन करण्यासाठी नागपूरच्या २०० कलावंतांनी ४००० चौ.फुटात रेखाटलेल्या महारांगोळीचे लोकार्पण केले जाणार आहे. महारांगोळीची संकल्पना व आरेखन रोहिणी घरोटे, मोहिनी माकोडे, श्रीकांत बंगाले यांनी केले आहे. मतदार जागृती ही रांगोळीची मध्यवर्ती कल्पना आहे. याशिवाय राजीव चौधरी व सहकाऱ्यांद्वारे ५०० चौ.फूट कॅनव्हासवर गीतरामायणाची गाणी कॅलिग्राफीवर आरेखित केली जातील.