जनरल मंचरशा आवारी यांचा ‘सशस्त्र सत्याग्रह’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:06 AM2021-07-01T04:06:55+5:302021-07-01T04:06:55+5:30
- जयंती २९ मे १८९८, पुण्यतिथी १ जुलै १९७४ माझे वडील स्व. जनरल मंचरशा आवारी यांच्या जीवनाच्या आलेखावरून स्वातंत्र्य ...
- जयंती २९ मे १८९८, पुण्यतिथी १ जुलै १९७४
माझे वडील स्व. जनरल मंचरशा आवारी यांच्या जीवनाच्या आलेखावरून स्वातंत्र्य संग्रामात तत्कालीन नागरिकांनी कशा पद्धतीने स्वत:ला वाहून घेतले होते, याची जाणीव होते. स्व. मंचरशा हे पारसी धनाड्य कुटुंबातील होते आणि अमेरिकेतून उच्च शिक्षण घेऊन ते नागपूरला टाटा समूहाच्या एम्प्रेस मिलमध्ये अभियंता म्हणून रुजू झाले. १९२० च्या काँग्रेस अधिवेशनात त्यांची भेट महात्मा गांधी यांच्याशी झाली आणि तेथून प्रभावित होत त्यांनी नोकरी झुगारून स्वातंत्र्य आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. महात्मा गांधी यांनी त्यांना सेठ पूनमचंद रांका यांनी दान केलेल्या जमिनीवर उभारण्यात आलेल्या सिरसपेठ येथील असहयोग आश्रममध्ये समाविष्ट केले. वयाच्या २६ व्या वर्षी ते शहर काँग्रेसचे अध्यक्ष झाले. त्यानंतर काँग्रेस कमिटीचा ठराव करून त्यांनी त्या काळच्या सी. पी. ॲण्ड बेरारच्या इंग्रज गव्हर्नरला अल्टिमेटम देत भारत सोडण्याचे आवाहन केले. त्याच वेळी त्यांनी सेवादलाच्या एक हजार स्वयंसेवकांसोबत भारतीय प्रजासत्ताक सैन्याची उभारणी केली आणि ते त्याचे सरसेनापती झाले. खादीचा गणवेश व सोबतीला तलवार यासह आपल्या भूमिगत कारवायांनी त्यांनी इंग्रजांना हैराण करून सोडले. मात्र, तलवारीचा उपयोग कधीही न करण्याचा त्यांनी प्रण दिला होता. याच सशस्त्र सत्याग्रहाच्या प्रेरणेतून पुढे महात्मा गांधी यांनी सविनय कायदेभंग व दांडीमार्च केले. सुभाषचंद्र बोसही या सत्याग्रहाने प्रभावित झाले होते. नेताजींनी १९४२ मध्ये स्थापन केलेल्या भारतीय राष्ट्रीय आर्मीची प्रेरणाही याच सशस्त्र सत्याग्रहातूनच घेतली होती.
- गेव्ह मं. आवारी, माजी खासदार
................