जनरल तिकीट कार्यालयाचे छत जनरलच !
By admin | Published: August 24, 2015 02:44 AM2015-08-24T02:44:11+5:302015-08-24T02:44:11+5:30
नागपूर रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेकडील भागात रेल्वे सुरक्षा दलाच्या शेजारी असलेल्या जनरल तिकीट काऊंटर कार्यालयाच्या छताचा काही भाग कोसळला असून
नागपूर : नागपूर रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेकडील भागात रेल्वे सुरक्षा दलाच्या शेजारी असलेल्या जनरल तिकीट काऊंटर कार्यालयाच्या छताचा काही भाग कोसळला असून इतर छत आणि लाईटची छतात लावलेली चौकट कोसळण्याच्या मार्गावर आहे. यामुळे प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून दीड वर्षात हे बांधकाम कसे कोसळले याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
दीड वर्षापूर्वी नागपूर रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेकडील भागात रेल्वे सुरक्षा दल आणि एसी वेटींग रुमच्या शेजारी जनरल तिकीट कार्यालयाचे बांधकाम करण्यात आले. परंतु या कार्यालयाच्या छताचा काही भाग कोसळला आहे. उर्वरीत भाग कधीही कोसळण्याची दाट शक्यता आहे. या कार्यालयात अनेक प्रवासी मोठमोठ्या रांगेत उभे राहून तिकीट खरेदी करतात. तर काही प्रवासी या हॉलच्या परिसरात झोपलेले आढळतात. त्यामुळे एखाद्या प्रसंगी या कार्यालयाचे छत कोसळल्यास एखाद्या प्रवाशाच्या जीवितावर बेतण्याची दाट शक्यता आहे.
छत कोसळूनही रेल्वे प्रशासनाने त्यावर कुठलीच उपाययोजना न केल्यामुळे रेल्वे प्रशासनाच्या कार्य पद्धतीवर शंका उपस्थित करण्यात येत आहे. भविष्यातील अप्रिय घटना टाळून प्रवाशांना सुरक्षा देण्यासाठी त्वरित या कार्यालयाच्या छताची डागडुजी करण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)