जन्माला येणाऱ्या १० लाख मुलांमध्ये अनुवांशिक आजार
By admin | Published: December 1, 2014 12:50 AM2014-12-01T00:50:06+5:302014-12-01T00:50:06+5:30
दरवर्षी जन्माला येणाऱ्या १० लाख मुलांमध्ये अनुवांशिक आजार (जेनेटीक डिसआॅर्डर) आढळून येतो. यात शरीराच्या बाह्यभागासोबतच आंतर अवयवांमध्ये आलेले व्यंग, जन्मापासून असणारी
राष्ट्रीय बालरोग परिषदेचा समारोप
नागपूर : दरवर्षी जन्माला येणाऱ्या १० लाख मुलांमध्ये अनुवांशिक आजार (जेनेटीक डिसआॅर्डर) आढळून येतो. यात शरीराच्या बाह्यभागासोबतच आंतर अवयवांमध्ये आलेले व्यंग, जन्मापासून असणारी मानसिक विकृती (डाऊन सिन्ड्रोम) किंवा मधुमेह व हृदयरोगासारख्या आजाराने मुले पीडित असतात. अशा रुग्णांना वेळीच तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार मिळाल्यास या आजारांवर उपचार शक्य आहे. परंतु स्त्री गर्भवती असतानाच या बाबत निदान झाल्यास हे आजार टाळताही येऊ शकतात, अशी माहिती एम्सच्या बालरोग विभागातील जेनेटिक विभागाचे प्राध्यापक डॉ. आय.सी. वर्मा यांनी दिली.
अकादमी आॅफ पीडियाट्रिक्स नागपूर शाखेतर्फे दोन दिवसीय बालरोग परिषद ‘नॅपकॉन-२०१४’चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. हॉटेल सेंटर पॉर्इंट येथे शनिवारी या परिषदेचे थाटात उद्घाटन झाले. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. आय.सी. वर्मा, डॉ. अनिल राऊत, डॉ. डी.एस. राऊत व डॉ. चेतन शेंडे यांच्यासह इंडियन अकादमी आॅफ पीडियाट्रिक्सशी संलग्न असलेल्या अकादमी आॅफ पीडियाट्रिक्सचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
आपल्या समाजात लग्न होण्यापूर्वी कुंडली पाहिली जाते, परंतु सुदृढ समाजासाठी ‘जिनोमपत्री’ काढणे आवश्यक आहे, असेही डॉ. वर्मा म्हणाले.
डेंग्यूच्या मृत्यूची संख्या वाढतेय
डॉ. महेश मोहिते म्हणाले, डेंग्यू पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णाला पुन्हा डेंग्यू झाल्यास मृत्यूची शक्यता वाढते. म्हणूनच मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी डेंग्यूच्या मृत्यूची संख्या वाढली आहे. शासनाने आत्ताच खबरदारी घेतली नाहीतर भविष्यात मोठे संकट कोसळण्याची शक्यता आहे. डासांची उत्पत्ती थांबविण्यासाठी प्रत्येकाने समोर येणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले. परिषदेत जनुकीय दोषांमुळे उद्भवणारे आजार या विषयावर तज्ज्ञानी मार्गदर्शन केले. देशभरातून ४०० बालरोगतज्ज्ञ परिषदेत सहभागी झाले होते. डॉ. एन.के. सुब्रम्हण्यम, डॉ. प्रदीप सूर्यवंशी, डॉ. संजय लालवानी, डॉ. सतीश देवपुजारी आदींनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी डॉ. सुचित बागडे, डॉ. अविनाश गावंडे, डॉ. दांडगे, डॉ. वसंत खळतकर, डॉ. उपाध्ये, डॉ. मोगरे, डॉ. देशमुख, डॉ. मंडलिक, डॉ. कुश झुनझुनवाला आदींनी सहकार्य केले.(प्रतिनिधी)