मेट्रो रेल्वेसाठी भूगर्भ सर्वेक्षण

By Admin | Published: May 16, 2015 02:31 AM2015-05-16T02:31:28+5:302015-05-16T02:31:28+5:30

मेट्रो रेल्वे उड्डाणपुलावरून (एलिवेटेड) धावणार आहे. त्यासाठी मोठमोठे पिलर उभारले जातील. मेट्रो रेल्वेचा सर्व भार या पिलरवर असेल.

Geological Survey for Metro Railway | मेट्रो रेल्वेसाठी भूगर्भ सर्वेक्षण

मेट्रो रेल्वेसाठी भूगर्भ सर्वेक्षण

googlenewsNext

जमिनीच्या खालचा स्तर तपासणार : प्रत्येक १०० मीटरवर नमुने घेणार
नागपूर : मेट्रो रेल्वे उड्डाणपुलावरून (एलिवेटेड) धावणार आहे. त्यासाठी मोठमोठे पिलर उभारले जातील. मेट्रो रेल्वेचा सर्व भार या पिलरवर असेल. त्यामुळे पिलर उभारण्यात येणारी जमीन कशी आहे, ती ओलावा धरून ठेवणारी आहे की कठीण खडकाची आहे, नेमकी कोणती जागा पिलर उभारण्यासाठी योग्य आहे, हे ठरविण्यासाठी मेट्रो रेल्वे मार्गावरील जमिनीचे भूगर्भ सर्वेक्षण केले जाणार आहे. शनिवारी या कामाची सुरुवातही होत आहे.
नागपूर मेट्रो रेल्वे कार्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधत प्रकल्पाच्या आजवरच्या वाटचालीची माहिती दिली. या वेळी दीक्षित म्हणाले, पूर्व-पश्चिम व उत्तर - दक्षिण असे दोन मार्ग मिळून सुमारे ३८ किलोमीटर मेट्रो धावणार आहे. तत्पूर्वी खबरदारी म्हणून भूगर्भ सर्वेक्षण (जिओ टेक्निकल सर्वे) केला जाणार आहे. अहमदाबादच्या ‘आनंदजीवाला’ या कंपनीला १ कोटी रुपयांमध्ये हे काम देण्यात आले आहे. नागपूर शहरात जमिनीखाली चार मीटरपर्यंत काळी माती आहे. खाली सुमारे १५ ते २० मीटरपर्यंत कठीण खडक नाही. मेट्रो रेल्वेचे वजन सांभाळायला मजबूत फाऊंडेशन हवे. त्यामुळे प्रत्येक १०० मीटरवर जमिनीत १५० एमएमचा ड्रील करून भूगर्भातील मातीचे नमूने घेतले जातील. अशाप्रकारे एकूण ३७० ठिकाणी जमिनीची तपासणी केली जाईल. दोन महिन्यात ही तपासणी आटोपून भूगर्भ सर्वेक्षणाचा अहवाल सादर केला जाईल. अहवालाच्या आधारवर पिलरचे डिझाईन कसे, फाऊंडेशनचा किती मजबूत करायचे या सर्व बाबी निश्चित होतील.
आज कामाचा शुभारंभ
नागपूर : सुरुवातीला खापरी ते सीताबर्डी या मार्गाचे काम सुरू करण्याची योजना आहे. त्यामुळे खापरी परिसरात सर्वप्रथम भूगर्भ सर्वेक्षण केले जाईल. शनिवारी दुपारी १ वाजता झिरो माईलजवळ आयोजित कार्यक्रमात मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ होणार आहे.
‘लोकसंवादा’तून जाणणार अपेक्षा
मेट्रो रेल्वे नागपूरकरांना आपलीशी वाटावी यासाठी नागपूर मेट्रो रेल्वे कार्पोरेशन लहान लहान बाबींवर विचार करीत आहे. याचाच एक भाग म्हणून ‘माझी मेट्रो’ ही कॅचलाईन वापरली जात आहे. आता या प्रकल्पाबाबत नागरिकांच्या असलेल्या अपेक्षा, सूचना जाणून घेण्यासाठी ‘लोकसंवाद’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत मेट्रो रेल्वे कार्पोरेशनचे अधिकारी थेट नागरिकांमध्ये जातील. त्यांच्याशी चर्चा करतील व त्यांची मते जाणून घेतील. यामुळे आपली मते विचारात घेऊन हा प्रकल्प उभारला जात आहे, अशी भावना नागरिकांमध्ये निर्माण होईल.
सर्वप्रथम खापरी परिसरात कामाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे चिचभवन येथील दत्तभवन सभागृहात शनिवारी सायंकाळी पहिला ‘लोकसंवाद’ कार्यक्रम होणार आहे. (प्रतिनिधी)

 

Web Title: Geological Survey for Metro Railway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.