‘जॉर्ज’...मी अनुभवलेला एक वादळी सहकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 10:25 AM2019-01-30T10:25:43+5:302019-01-30T10:26:31+5:30
सन १९६१ ची गोष्ट असेल...मी रेल्वेत मुंबईच्या दादर स्टेशनवर कार्यरत होतो. अचानक बुलंद आवाज, डोक्यावर दाट व विखुरलेले केस, शरीरावर खादीचे कपडे, पायात चप्पल व डोळ्यांवर जाड्या फ्रेमचा चष्मा असलेल्या एका व्यक्तीने काही कार्यकर्त्यांसमवेत रेल्वे प्रशासनाविरोधात नारे लावायला सुरुवात केली.
हरीश अड्याळकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सन १९६१ ची गोष्ट असेल...मी रेल्वेत मुंबईच्या दादर स्टेशनवर कार्यरत होतो. अचानक बुलंद आवाज, डोक्यावर दाट व विखुरलेले केस, शरीरावर खादीचे कपडे, पायात चप्पल व डोळ्यांवर जाड्या फ्रेमचा चष्मा असलेल्या एका व्यक्तीने काही कार्यकर्त्यांसमवेत रेल्वे प्रशासनाविरोधात नारे लावायला सुरुवात केली. पोलिसांचा मार पडत असतानादेखील त्या व्यक्तीची जिद्द कायम होती. तो झुंझारपणा केवळ प्रभावी करणारा नव्हता तर समोरच्याच्या विचारधारेचाच ठाव घेणारा होता. राजकारणात ‘अँग्री यंग मॅन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व कामगारांच्या नसानसांशी एकरूप होणाऱ्या जॉर्ज फर्नांडिस यांच्याशी झालेला तो पहिला सामना ठरला.
त्यानंतर जॉर्ज यांच्याशी अनेकदा संपर्क आला. सुरुवातीला संपर्क हा चळवळीपुरता मर्यादित ठरला. मात्र हळूहळू वरून कठोर वाटणारे जॉर्ज जिव्हाळ्याचे सहयोगी बनले. त्यांच्याशी मित्रत्वाचे नाते असले तरी वयातील अंतर पाहता त्यांना मित्र म्हणणे योग्य ठरणार नाही. मनातील वेदना बोलून दाखविणारा, स्वत:चा संताप व्यक्त करणारा व व्यवस्थेविषयी असणारी चीड आंदोलनाच्या माध्यमातून समोर आणणारे जॉर्ज फर्नांडिस जवळून अनुभवण्याची मला संधी मिळाली.
तरुणपणापासूनच समाजवादाचा झेंडा घेऊन चालणाऱ्या फर्नांडिस यांनी भारतीय राजकारणात एक वेगळे स्थान निर्माण केले. ६० आणि ७०च्या दशकातील एक काळ असता होता की जॉर्ज फर्नांडिस या नावाची मोहिनी मुंबईसह नागपुरातदेखील होती. फर्नांडिस हेदेखील लोहिया यांच्या विचाराने प्रेरित झाले होते. त्यांच्या विचारांप्रती ते समर्पित होते. जॉर्जचे विचार, ऊर्जा, शक्ती व उत्साह पाहून लोहियांनीच त्यांना उभे केले. लोहियांच्या मार्गावर चालणाऱ्या जॉर्ज यांचे वैचारिक अधिष्ठान मजबूत होते. लोहियावादाने आम्ही आणखी जवळ आलो. इतरांसाठी ते ‘फर्नांडिस साहेब’ असले तरी माझ्यासाठी ते नेहमी जॉर्जच राहिले.
जॉर्ज यांच्या राजकीय व सार्वजनिक जीवनात विरोधाभास नव्हता. ते दारू पित नव्हते आणि कॉकटेल पार्ट्यांनादेखील जात नव्हते. औद्योगिक घराण्यांपासून त्यांनी स्वत:ला दूरच ठेवले. स्पष्टवक्तेपणातून त्यांनी आपल्या पक्षातील लोकांवरच अनेकदा टीकादेखील केली. राजकीय आणि सार्वजनिक जीवनात सिद्धांत व नीती यांना अनुसरूनच ते जगले. कामगार स्वत:हून संप करत नाही, तर मालक संप करायला त्याला भाग पाडतो, असे त्यांचे ठाम मत होते. कामगारांना न्याय मिळेपर्यंत ते संपाचा पाठपुरावा करायचे.
नागपुरात येण्याअगोदर हमखास त्यांचा मला निरोप यायचा आणि अनेकदा तर पहाटेच त्यांना घेण्यासाठी रेल्वेस्थानकावर पोहोचावे लागायचे. जॉर्ज यांचे अनेक भाषांवर प्रभुत्व होते. त्यामुळे ते लोकांना आपलेसे करायचे. लोकांचे काम झालेच पाहिजे हा त्यांचा आग्रह असायचा. जर काम झाले नाही ते आक्रमक व उत्तेजित व्हायचे. मात्र आंदोलन नेहमी अहिंसकच झाले पाहिजे, अशी त्यांची भूमिका असायची. १९७४ च्या रेल्वे आंदोलनादरम्यान तर त्यांनी अक्षरश: पायाला भिंगऱ्या लावून काम केले होते. देशव्यापी रेल्वे आंदोलनाने तर मजदूर आंदोलनाच्या इतिहासातील एक नवा अध्यायच रचला होता. आणीबाणीच्या काळात भूमिगत असताना ते नागपूरला येणार होते. तसा निरोपदेखील आला होता. आम्ही तयारीदेखील करुन ठेवली होती. मात्र अचानक त्यांच्या येण्याची माहिती कुणीतरी शासनदरबारी ‘लिक’ केली. ऐनवेळी त्यांनी कार्यक्रमात बदल केला. पुढे ते केंद्रीय मंत्री झाले. मात्र मंत्री असतानादेखील साधेपणा कायम होता. त्यांच्या घराचे दरवाजे उघडे असायचे हे मी अनुभवले आहे. मोठ्या पदावर असतानादेखील ते स्वत:चे कपडे स्वत: धुवायचे. साधे जीवन-उच्च विचार ही जीवनपद्धती त्यांनी आयुष्यभर जपली. राजकारणाच्या उत्तरार्धात त्यांच्यावर अनेक आरोप झाले. त्यामुळे ते व्यथितदेखील झाले होते व माझ्या कार्यालयात पाणावल्या डोळ्यांनी त्यांनी व्यथा बोलून दाखविली होती. जगाने कितीही आरोप केले तरी ते भ्रष्टाचार करूच शकत नाही हा माझा विश्वास आजही कायम आहे. जॉर्ज अवलिया मनुष्य होते. ते केवळ कामगारांसाठी जगले. भारतीय राजकारणातील एक वादळी पर्व आज संपले. अक्षरश: दंतकथा वाटावी असे विलक्षण राजकीय जीवन जॉर्ज जगले. त्यांचे प्रभावी वक्तृत्व, झुंझार वृत्ती, पराकोटीचा साधेपणा, प्रखर राष्ट्रभक्ती, सामान्यांसाठी प्राण पणाला लावणारी तळमळ यामुळे ते इतर नेत्यांपेक्षा नेहमी वेगळेच ठरले. त्यांच्याशी झालेली प्रत्येक भेट माझ्या मर्मबंधातली ठेव आहे, खूप काही देऊन जाणारी ! असा माणूस पुन्हा होणे नाही.