कामगार चळवळीबाबत ‘जॉर्ज’ होते चिंतित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 11:32 AM2019-01-30T11:32:56+5:302019-01-30T11:33:27+5:30
राज्यातील कामगार चळवळीत माजी केंद्रीय मंत्री व धडाडीचे कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस यांचे मौलिक योगदान होते.
योगेश पांडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यातील कामगार चळवळीत माजी केंद्रीय मंत्री व धडाडीचे कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस यांचे मौलिक योगदान होते. राज्यातील कामगार चळवळीतील स्थित्यंतरे त्यांनी अनुभवली होती. अनेक क्षेत्रातील चळवळींना स्वत:च्या लढवय्या स्वभावाने बळ दिले होते. मात्र सक्रियतेच्या अखेरच्या काळात याच चळवळीबाबतच्या भविष्याच्या चिंतेने त्यांना ग्रासले होते. देशातील कामगार चळवळ विभागीत होत असल्याबाबत त्यांनी नागपुरातच चिंता व्यक्त केली होती व भविष्यातील अस्तित्वाबाबत भीतीदेखील बोलून दाखविली होती.
२८ जून २००५ रोजी ‘संपुआ’चे निमंत्रक असलेले फर्नांडिस नागपूर दौऱ्यावर आले होते. एका दिवसात तीन ते चार कार्यक्रम करणे ही त्यांची अगोदरपासूनची सवय होती. त्यानुसार त्या दिवशी नागपुरात त्यांनी मोर भवनात आयोजित हिंद मजूदर किसान संघाच्या एका सभेत कामगार चळवळीसमोरील आव्हाने व भविष्य यावर व्याख्यान दिले होते. भारतीय कामगार चळवळ ही ‘सेक्युलर’ व ‘नॉनसेक्युलर’मध्ये विभागली गेली आहे. चळवळीत धर्माचा शिरकाव झाल्याने मूळ उद्देशापासून ती भरकटली जात आहे, असे परखड मत त्यांनी व्यक्त केले होते.
कामगार चळवळीत माफियादेखील शिरले आहेत. अशास्थितीत कामगार चळवळीचे भविष्य अंधकारमय आहे, अशी भीती त्यांनी बोलून दाखविली होती. यावेळी त्यांनी ‘संपुआ’ सरकारच्या आर्थिक धोरणांवरदेखील जोरदार टीका
केली होती.
संघस्थानी झालेली ‘ती’ भेट
जॉर्ज फर्नांडिस हे समाजवादी विचारसरणीचे असले तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाºयांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्याच दिवशी त्यांनी संघाच्या मुख्यालयाला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी तत्कालीन सरसंघचालक डॉ.के.सी.सुदर्शन व सरकार्यवाह डॉ.मोहन भागवत यांची भेट घेतली होती व सुमारे साडेतीन तास ते मुख्यालयात होते. त्यावेळी राजकीय परिस्थिती, कम्युनिस्ट पक्ष यावर चर्चा झाली होती. विशेष म्हणजे इंदिरा गांधी यांची प्रशंसा केल्याबद्दल फर्नांडिस यांनी काही दिवस अगोदरच सरसंघचालकांबाबत नाराजी व्यक्त केली होती.
सरकारे आएंगी-जाएंगी...
यावेळी कामगारांच्या बळकटीकरणावर त्यांनी जोर दिला होता, ‘सरकारे आएंगी-जाएंगी, लेकिन मजदूर की ताकद रहनी चाहिए’ असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले होते. कामगारांमुळेच शेतकरी तसेच लहान उद्योजकांना बळ मिळते. जर कामगारच शक्तिहीन झाला तर लोकशाहीचे ताळतंत्रच बिघडेल, असे त्यांचे मत होते.
नेत्यामध्ये दडला होता कट्टर कार्यकर्ता
फर्नांडिस हे राष्ट्रीय स्तरावरील नेते असले तरी त्यांच्यातील एक कट्टर कार्यकर्ता नेहमीच दिसून यायचा. नागपुरातदेखील याचा अनुभव आला होता. २००५ साली नागपुरात सरसंघचालकांशी भेट घेण्यासाठी आले होते. त्यादिवशी झाशी राणी चौकातील मोर भवनात जॉर्ज फर्नांडिस यांचे दुपारी ४ वाजता व्याख्यान होते. ते आटोपल्यानंतर ते मोटारीने पत्रकार संघाकडे निघाले. चौकातच कम्युनिस्ट पक्षातर्फे पेट्रोल दरवाढीविरुद्ध आंदोलन सुरू होते. कम्युनिस्टांचा केंद्राला पाठिंबा असतानादेखील शासनाविरोधातच नारे दिले जात होते. यावेळी माझीही तेथे जाऊन नारेबाजी करण्याची इच्छा झाली होती, अशी भावना फर्नांडिस यांनी नागपुरात बोलून दाखविली होती.