नागपुरात जिओचा मोबाईल टॉवर सुरू होता चोरीच्या विजेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 01:10 AM2019-08-04T01:10:59+5:302019-08-04T01:12:18+5:30
रिलायन्स जिओकडून विजेची चोरी करून टॉवर चालविला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वीज वितरण कंपनी फ्रेंचाईजी एसएनडीएलने बोरगाव रोडवरील योगेंद्रनगरात कारवाई केली. एमएसबीसी स्वीचच्या माध्यमातून वीज मीटरला होणारा पुरवठा थेट वळवून रोज जवळपास सहा केडब्ल्यू वीजचोरी केली जायची, अशी माहिती एसएनडीएलने दिली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रिलायन्स जिओकडून विजेची चोरी करून टॉवर चालविला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वीज वितरण कंपनी फ्रेंचाईजी एसएनडीएलने बोरगाव रोडवरील योगेंद्रनगरात कारवाई केली. एमएसबीसी स्वीचच्या माध्यमातून वीज मीटरला होणारा पुरवठा थेट वळवून रोज जवळपास सहा केडब्ल्यू वीजचोरी केली जायची, अशी माहिती एसएनडीएलने दिली आहे.
जिओच्या या मोबाईल टॉवरसाठी जानेवारीमध्ये विद्युत पुरवठा दिला होता. त्याचा ग्राहक क्रमांक ४१००२२८८८२११ असा आहे. हे कनेक्शन रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडच्या नावाने आहे. मात्र कंपनी विजेचे बिल भरत नव्हती. अखेर १५ दिवसांचा नोटीस देऊन २८ जूनला वीजपुरवठा कापण्यात आला तरीही टॉवर सुरूच होता. जनरेटरचा उपयोग करून टॉवर चालवीत असल्याचा देखावा कंपनीने केला होता. यादरम्यान जिओने १९ जुलैला थकबाकी रक्कम भरली, मात्र चालू महिन्याचे बिल भरले नव्हते. त्यामुळे वीजपुरवठा सुरू केला नव्हता.
याच दरम्यानच्या काळात वीज वितरण कंपनी फ्रेंचाईजी एसएनडीएलला ट्रान्सफार्मरबद्दल शंका आली. त्यामुळे आपल्या पथकाला तपासकामी लावले. जनरेटर बंद असतानाही टॉवर सुरूच असल्याचे या पथकाच्या निदर्शनास आले. या आधारावर २ ऑगस्टला पथकातील सहा सदस्यांनी परिसराची तपासणी सुरू केली. यात ही वीजचोरी आणि त्यासाठी लावलेल्या स्वीचचा प्रकार उघडकीस आला. या ठिकाणी उपस्थित असलेले संदीप बाळबुधे यांनी चोरीची वीज टॉवरसाठी वापरत असल्याचे मान्य केले.
५४ हजाराची चोरी आणि ६० हजारांचा कम्पाऊंडिंग चार्ज
एसएनडीएलने वीजपुरवठा खंडित करण्याची तारीख २८ जून गृहित धरून ३५ दिवस ही चोरी सुरू असल्याचा अंदाज लावला आहे. चोरीच्या विजेचे मूल्य ५४ हजार ४३० रुपये दर्शविण्यात आले आहे. यासोबतच ६० हजार रुपयांचे कम्पाऊंडिंग शुल्क असा अतिरिक्त भरणा शुल्कही लावण्यात आला आहे. शनिवारी सायंकाळपर्यंत दोन्ही कंपन्यांमध्ये चर्चा सुरू होती. वृत्त लिहिपर्यंत जिओने दंडाचे शुल्क भरलेले नव्हते.