जर्मनीच्या राजदूतांनी घेतली सरसंघचालकांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 10:32 PM2019-07-17T22:32:09+5:302019-07-17T22:34:38+5:30
जर्मनीचे भारतातील राजदूत वॉल्टर जे लिंडनर यांनी बुधवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात जाऊन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी संघप्रणाली समजावून घेत संघाच्या विविध उपक्रमांबाबत जाणून घेतले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जर्मनीचे भारतातील राजदूत वॉल्टर जे लिंडनर यांनी बुधवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात जाऊन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी संघप्रणाली समजावून घेत संघाच्या विविध उपक्रमांबाबत जाणून घेतले.
मे महिन्यात भारतात राजदूत म्हणून जबाबदारी सांभाळल्यानंतर वॉल्टर जे लिंडनर भारताला जाणून घेण्यासाठी उत्साहित आहेत. भारत आणि जर्मनी या दोन्ही देशांतर्गत झालेल्या करारांतर्गत जर्मनीच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाने मंगळवारी नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा दौरा केला. यानंतर वॉल्टर लिंडनर यांनी नागपूर दौऱ्यादरम्यान संघाला जाणून घेण्याची इच्छा प्रदर्शित केली. बुधवारी त्यांनी सर्वप्रथम संघाचे आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या महाल येथील निवासस्थानाला भेट दिली. त्यानंतर डॉ. हेडगेवार स्मृतिमंदिर परिसरात जाऊन डॉ. हेडगेवार व द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. त्यानंतर महाल येथील संघ मुख्यालयात जाऊन त्यांनी सरसंघचालकांची भेट घेतली. यावेळी विविध सामाजिक मुद्यांवरदेखील चर्चा झाली. खुद्द लिंडनर यांनीच सरसंघचालकांसमवेत झालेल्या भेटीची छायाचित्रे ट्विटरवर ‘शेअर’ केली.