चिमुकल्याला ऑनलाईन शिकवणीत सहभागी करून घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:08 AM2021-07-08T04:08:29+5:302021-07-08T04:08:29+5:30
नागपूर : धैर्य बनसोड या चिमुकल्याला गुरुवारपासून केजी-२ वर्गाच्या ऑनलाईन शिकवणीत सहभागी करून घ्या असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या ...
नागपूर : धैर्य बनसोड या चिमुकल्याला गुरुवारपासून केजी-२ वर्गाच्या ऑनलाईन शिकवणीत सहभागी करून घ्या असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी अमरावती रोडवरील मदर पेट किंडरगार्टन शाळेला दिला.
प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अनिल किलोर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. पूर्ण वार्षिक शुल्क जमा केले नाही म्हणून शाळेने धैर्यचा केजी-१ वर्गाचा अंतिम प्रगती अहवाल थांबवून ठेवला होता. तसेच, त्याला केजी-२ वर्गात प्रवेश दिला नाही. त्यामुळे त्याने वडील प्रीतेश बनसोड यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. २२ जून रोजी न्यायालयाने धैर्यला केजी-१ वर्गाचा अंतिम प्रगती अहवाल व केजी-२ वर्गात प्रवेश देण्यात यावा असा आदेश शाळेस दिला होता. त्यानंतर शाळेने या आदेशाचे पालन केले, पण थकीत व नवीन शुल्कासाठी धैर्यला केजी-२ वर्गाच्या ऑनलाईन शिकवणीतून बाहेर ठेवण्यात आले. सुनावणीदरम्यान, धैर्यच्या वडिलांनी केजी-१ वर्गाचे उर्वरित ३३ हजार ४०० रुपये व केजी-२ वर्गाचा १८ हजार ५२० रुपयांचा पहिला हप्ता एक आठवड्यात जमा करण्याची ग्वाही दिली. शाळेने हा प्रस्ताव मान्य केला. परिणामी, न्यायालयाने हा आदेश देऊन प्रकरणावर दोन आठवड्यानंतर पुढील सुनावणी निश्चित केली. याचिकाकर्त्यातर्फे ॲड. एस. एस. संन्याल यांनी कामकाज पाहिले.