बेईमानी करणाऱ्या काँग्रेस नेत्याला गाडीतून ओढा व दोन लावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:09 AM2021-09-21T04:09:28+5:302021-09-21T04:09:28+5:30
नागपूर : जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा काँग्रेसमधील गटबाजी उफाळून येण्याची चिन्हे आहेत. युवक कल्याण व क्रीडामंत्री ...
नागपूर : जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा काँग्रेसमधील गटबाजी उफाळून येण्याची चिन्हे आहेत.
युवक कल्याण व क्रीडामंत्री सुनील केदार यांनी तर आक्रमक भूमिका घेतली आहे. पक्षाचा कितीही मोठा नेता काँग्रेससोबत बेईमानी करीत असेल तर तिथेच गाडीतून ओढा व दोन लावा. पोलीस केसेस मी पाहून घेतो, अशा शब्दात केदार यांनी रविवारी जिल्हा काँग्रेसच्या बैठकीत कार्यकर्त्यांना प्रक्षोभक निर्देश दिले.
जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीसाठी रविवारी जिल्हा काँग्रेसची आढावा बैठक झाली. या वेळी अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक होते. क्रीडामंत्री सुनील केदार, प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे, किशोर गजभिये, प्रवक्ते अतुल लोंढे, शकुर नागानी, तक्षशिला वाघधरे, जि.प. अध्यक्ष रश्मी बर्वे यांच्यासह जिल्हा परिषदेचे आजी माजी सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत केदारांनी एकाएक भडका घेतला. ते म्हणाले, या वेळी काँग्रेसचे उमेदवार लढत असताना कुणी समजा अडथळा आणला, तर सोडू नका. काँग्रेसची पदे भोगायची व कुणीतरी मोठा माणूस माझ्या मागे आहे म्हणून मी वाटेल ते करील, अशी भूमिका घेणाऱ्याला दोन लावा. वाटल्यास मला फोन करा. मी मंत्रिपद बाजूला ठेवून येईल. काही चिंता करायची नाही. हा पक्ष तुम्ही आम्ही सर्वांनी उभा केला आहे, अशा शब्दात त्यांनी उपस्थितांना चिथवले. त्यांचा रोख आशीष देशमुख यांच्याकडे असावा, असा अंदाज उपस्थितांनी बांधला.
आशीष देशमुखांचे पद काढण्याचा ठराव
- बैठकीत युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल सिरिया यांनी आशीष देशमुख यांच्या कार्यशैलीवर नाराजी व्यक्त केली. देशमुख यांनी पक्षाच्या मंत्र्यांवर जाहीर आरोप करून पक्षाला कमजोर करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांचे प्रदेश काँग्रेसचे पद काढावे व शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी करणारा ठराव त्यांनी मांडला. कुंदा राऊत यांनी त्याला अनुमोदन दिले. यावर प्रवक्ते अतुल लोंढे सभागृहाचे मत जाणून घेण्याची सूचना केली. यावर बहुतांश लोकांनी होकार दिला व ठराव मंजूर करण्यात आला. जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी संबधित ठराव प्रदेश काँग्रेसकडे पाठविला जाईल, असे स्पष्ट केले.
पालकमंत्र्यांवरही नाराजी
- जि.प. सदस्य दुधाराम सव्वालाखे यांना मारहाण प्रकरणी गज्जू यादव यांना काँग्रेसमधून निलंबित करण्यात आले आहे. असे असताना पालकमंत्री नितीन राऊत हे यादव यांना सोबत घेऊन ग्रामीण भागात फिरतात. त्यामुळे चुकीचा संदेश जात आहे. याची दखल घेत पक्षातर्फे पालकमंत्र्यांनाही समज देण्यात यावी, अशी मागणीही या बैठकीत करण्यात आली.