एका लाखाच्या बदल्यात घ्या चार लाख, बनावट नोटांच्या रॅकेटचा भंडाफोड
By योगेश पांडे | Published: May 30, 2024 10:13 PM2024-05-30T22:13:22+5:302024-05-30T22:14:10+5:30
फेसबुकवरून दिली जात होती जाहिरात : महाराजबागेजवळ पोलिसांनी रंगेहाथ पकडले
नागपूर: एका लाखाच्या बदल्यात चार लाख रुपये देण्याचे आमिष दाखवत बनावट नोटा देणाऱ्या रॅकेटचा पोलिसांनी भंडाफोड केला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे आरोपींकडून फेसबुकच्या माध्यमातून हे रॅकेट संचालित करण्यात येत होते. या प्रकरणात पोलिसांनी चार आरोपींना रंगेहाथ अटक केली आहे. सीताबर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीत महाराजबागेजवळ ही घटना घडली.
सतीश ज्ञानदेव गायकवाड (२९, वडोदा, मानकापूर, बुलढाणा), शब्बीर ऊर्फ मोनू बलाकत शेख (२७, राजीवनगर, एमआयडीसी), शुभम सहदेव पठाण (२७, आयसी चौक, गेडाम ले आऊट, एमआयडीसी) व गौतम राजू भलावी (२१, आयसी चौक, एमआयडीसी) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींकडून फेसबुकवर एक लाखाच्या बदल्यात चार लाख रुपये घ्या, अशी जाहिरात करण्यात आली होती. २९ मे रोजी राहुल वासुदेव ठाकूर (३१, सुशीलनगर, झिंगाबाई टाकळी) याला मोबाइलवर संबंधित जाहिरात दिसली. त्याने ८६०४३०६८८५ या क्रमांकावर फोन केला. समोरील व्यक्तीने त्याचे नाव विजय राठोड असे सांगितले. त्याने एक लाख रोकड दिली तर चार लाख रुपये देऊ, असे सांगितले.
राहुल आरोपीच्या सांगण्यावरून महाराजबागेजवळ ८० हजार रुपये घेऊन गेला. तेथे आरोपी उभा होता. राहुलने त्याला ८० हजार रुपये दाखविले. यावर आरोपीने काळ्या बॅगेत चार पट रक्कम असल्याचे सांगितले. राहुलला संशय आल्याने त्याने बॅगची पाहणी सुरू केली. हे पाहून आरोपी ८० हजार रुपये हिसकावून पळायला लागला. हे पाहून राहुलने आरडाओरड केली. आरोपी व त्याच्या चार साथीदारांनी राहुलला मारहाण केली व चाकूचा धाक दाखवत खाली पाडले. आवाज ऐकून राहुलचा मित्र व मामा तेथे पोहोचले. त्याचवेळी पोलिसदेखील गस्तीवर होते. त्यांनी चार आरोपींना ताब्यात घेतले तर एक जण फरार झाला. पोलिसांनी बॅगमधील नोटा पाहिल्या असता त्या बनावट असल्याचे आढळले. पोलिसांनी चारही आरोपींविरोधात गुन्हा नोंदवत त्यांना अटक केली आहे.
व्हॉट्सॲप कॉलवरच करायचे चर्चा
आरोपींना पकडले जाण्याची भीती होती. त्यामुळे ते नेहमी जाळ्यात अडकलेल्यांशी व्हॉट्सॲप कॉलवरूनच बोलायचे. आरोपींपैकी एक असलेल्या सतीशलादेखील त्यांनी जाळ्यात अडकविले होते. परत गेलेली रक्कम मिळावी यासाठी तोदेखील या टोळीत सहभागी झाला होता.
कुठून आल्या बनावट नोटा ?
या आरोपींकडून बनावट नोटांची बंडले जप्त करण्यात आली आहेत. या आरोपींकडे बनावट नोटा कुठून आल्या व त्यांची आणखी कुठे लिंक आहे याचा पोलिस शोध घेत आहेत. या प्रकारे त्यांनी किती जणांना फसविले याचीदेखील चौकशी सुरू आहे.
आरोपींकडून ४४ बनावट नोटांची बंडले जप्त
आरोपींकडून पोलिसांनी बनावट नोटांची ४४ बंडले जप्त केली आहेत. यातील अनेक नोटा लहान मुलांच्या खेळण्यातील नोटा होत्या व बंडलांमध्ये ५००, २०० व १०० रुपयांच्या नोटांचा समावेश होता. आरोपींनी प्रत्येक बंडलात वरील नोट खरी लावली होती. त्यामुळे बंडल पाहिल्यावर ते खऱ्या नोटांचे वाटत होते.