रेल्वे, हवाई प्रवासासह मॉल प्रवेशासाठी घरबसल्या मिळवा पास !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:09 AM2021-08-26T04:09:29+5:302021-08-26T04:09:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने काही निर्बंध जाहीर केले आहे. याअंतर्गत आंतरजिल्हा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने काही निर्बंध जाहीर केले आहे. याअंतर्गत आंतरजिल्हा व आंतररराज्य प्रवासासाठी आता ई-पासची सक्ती करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्याअंतर्गत मॉल व इतर जागी प्रवेशासाठीसुद्धा दोन लस घेतलेल्यांनाच प्रवेश दिला जात आहे. त्यासाठीसुद्धा हा ई-पास फायद्याचा ठरणार आहे. हा पास बनविणे अतिशय सोपे असून घरबसल्या पास मिळविता येईल. यासाठी राज्य शासनाने वेब लिंक जारी केली आहे.
बॉक्स
असा मिळवा ई-पास
- पात्र नागरिकांनी https://epassmsdma.mahait.org ही वेब लिंक उघडावी.
- त्यातील ‘ट्रॅव्हल पास फॉर व्हॅक्सिनेटेड सिटिझन्स’ यावर क्लिक करा.
- त्यानंतर आपला कोविड लसीकरणासाठी नोंदविलेला मोबाइल क्रमांक नमूद करावा. लगेचच मोबाइलवर ओटीपी अर्थात एकवेळ वापरासाठीचा पासवर्ड लघुसंदेश (एसएमएस) द्वारे प्राप्त होईल.
- हा ओटीपी नमूद केल्यानंतर लाभधारकाचे नाव, मोबाइल क्रमांक, लाभधारकाचा संदर्भ क्रमांक, इत्यादी तपशील आपोआप समोर दिसतील.
- त्यामध्ये ‘पास निर्माण करा’ (जनरेट पास) या पर्यायावर क्लिक करावे.
- त्यावर क्लिक करताच अर्जदाराचा तपशील तसेच कोविड लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेतल्याची दिनांक, इत्यादी सर्व तपशील आपोआप दिसेल.
- या तपशिलामध्ये ‘सेल्फ इमेज’ या पर्यायामध्ये अर्जदाराने स्वतःचे छायाचित्र अपलोड करावे. ते मोबाईल गॅलरीतून अपलोड करता येऊ शकते किंवा मोबाईल कॅमेराद्वारे जागीच छायाचित्र (सेल्फी) काढूनदेखील अपलोड करता येईल.
- ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील २४ तासांमध्ये युनिव्हर्सल ट्रॅव्हल पासकरिता लघुसंदेश (एसएमएस)द्वारे लिंक प्राप्त होईल.
- लिंक प्राप्त झाल्यानंतर ई-पास मोबाइलमध्ये जतन (सेव्ह) करून ठेवावा.
बॉक्स
जिल्ह्यात एकूण २७ लाखांवर नागरिकांचे लसीकरण
नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत २७.५० लाख नागरिकांचे लसीकरण झाले आहे. यात नागपूर शहरातील तब्बल १६ लाख ८ हजार २७९ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. यातही पहिला डोस घेणारे ११,३४,१२८ नागरिक असून दुसरा डोस घेणारे ४,७४,१५१ नागरिक आहेत. ग्रामीण भागातील ११.५० लाख लोकांचे लसीकरण आतापर्यंत झाले आहे. यातही नऊ लाख लोकांनी पहिला डोस, तर २.५० लाख लोकांनी दुसरा डोस घेतला आहे.