भविष्यातील नवी आव्हाने पेलण्यासाठी सज्ज व्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:11 AM2021-09-06T04:11:04+5:302021-09-06T04:11:04+5:30

नागपूर : काळ बदलत आहे. नोकऱ्यांमध्ये घट होत आहे. पिढीचे आयुर्मान कमी होत चालले आहे. कालचे प्रश्न आज राहिलेले ...

Get ready to face new challenges in the future | भविष्यातील नवी आव्हाने पेलण्यासाठी सज्ज व्हा

भविष्यातील नवी आव्हाने पेलण्यासाठी सज्ज व्हा

googlenewsNext

नागपूर : काळ बदलत आहे. नोकऱ्यांमध्ये घट होत आहे. पिढीचे आयुर्मान कमी होत चालले आहे. कालचे प्रश्न आज राहिलेले नसून बदलत्या काळात नव्याने प्रश्न निर्माण होत आहेत. त्यामुळे भविष्यातील नवी आव्हाने पेलण्यासाठी सज्ज व्हा, उद्याच्या काळातील स्थैर्यासाठी आतापासूनच स्वत:ला सिद्ध करा, असे आवाहन आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त रवींद्र ठाकरे यांनी नव्या पिढीला केले.

मराठा सेवा संघाच्या स्थापनेला ३१ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त बळीराजा संशोधन केंद्रात आयोजित वर्धापनदिन समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे प्रदेश महासचिव मधुकर मेहकरे होते. प्रमुख पाहुणे संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ता प्रा. दिलीप चौधरी, न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेचे उपसंचालक विजय ठाकरे, क्रीडा व युवक सेवा उपसंचालक शेखर पाटील, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता अंकुर देसाई, जिजाऊ सृष्टी प्रमुख पुरुषोत्तम कडू, माजी प्रदेश उपाध्यक्ष रमेश बोरकुटे, जिल्हाध्यक्ष दिलीप खोडके, कार्याध्यक्ष श्याम डहाके आदी हजर होते.

ठाकरे पुढे म्हणाले, शेती हा मुख्य गाभा आहे. शेतीचे प्रश्न समजून घ्या. त्यातील नवे तंत्रज्ञान आत्मसात करून उद्याच्या बेरोजगारीवर मात करण्यासाठी पुढे या. मराठा सेवा संघाच्या वाटचालीत आपण सहकार्य करत राहू, असे आश्वासनही त्यांनी दिले.

प्रा. दिलीप चौधरी म्हणाले, वैयक्तिक कामे बाजूला ठेवून संघाप्रति तळमळ जोपासणाऱ्या कार्यकर्त्यांमुळेच मराठा सेवा संघाचे रूप आज व्यापक झाले आहे. यात वक्ते, लेखक, कार्यकर्ते, पदाधिकारी, विविध कार्यालयातील अधिकारी, राजकीय नेते, शेतकरी बांधव, उद्योजक, व्यावसायिक यांच्यासह सर्वांचाच भरीव वाटा आहे. पुरुषोत्तम खेडेकर यांच्यासोबत जिगरबाज अधिकाऱ्यांनी मराठा सेवा संघाची स्थापना केली. झपाटल्यासारखा संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. वाढीसाठी जाणिवपूर्वक कसोशीने प्रयत्न केल्याचा उल्लेख त्यांनी केला.

मराठा सेवा संघाचे व्यापक कार्य मांडताना मधुकर मेहकरे म्हणाले, संभाजी ब्रिगेड राजकारणामध्ये पाय घट्ट रोवत आहे. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद राज्यभर कार्य पसरवित आहे. संगीतसूर्य केशवराव भोसले सांस्कृतिक परिषदेचेही देशभर व्यापक काम सुरू आहे. मातृतीर्थ सिंदखेड राजाचे बदलते स्वरूप संपूर्ण महाराष्ट्र व देश अनुभवत आहे. प्रास्ताविकातून दिलीप खोडके यांनी ३१ वर्षांच्या काळातील मराठा सेवा संघाच्या कार्याचा लेखाजोखा मांडून समाजात घडलेला बदल सांगितला. कार्यक्रमाला सुरेंद्र उगले, पंकज निबाळकर, प्रमोद वैद्य, सुनिता जिचकार, जया देशमुख, प्रताप पटले, अमोल हाडके, अनुप मुरतकर, शिरीष गोळे, वैभव शिंदे, संदीप पोटपिटे, विक्की जवंजाळ आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

Web Title: Get ready to face new challenges in the future

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.