कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी सज्ज व्हा! उच्च न्यायालयाचा राज्य सरकार व प्रशासकीय अधिकाऱ्यांना आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 09:25 AM2021-05-13T09:25:52+5:302021-05-13T09:25:57+5:30

उच्च न्यायालयात तीन जनहित याचिका प्रलंबित असून, त्यावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अविनाश घरोटे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, न्यायालयाने कोरोनाच्या संभावित तिसऱ्या लाटेला गंभीरतेने घेणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.

Get ready for the third wave of Corona Order of the High Court to the State Government and Administrative Officers | कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी सज्ज व्हा! उच्च न्यायालयाचा राज्य सरकार व प्रशासकीय अधिकाऱ्यांना आदेश

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी सज्ज व्हा! उच्च न्यायालयाचा राज्य सरकार व प्रशासकीय अधिकाऱ्यांना आदेश

Next

 
नागपूर : सध्या एकीकडे जीवनरक्षक औषधांचा व ऑक्सिजनचा पुरवठा वाढल्याने आणि दुसरीकडे कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्यामुळे परिस्थिती सावरली आहे़ परंतु, असे असले तरी, शांत बसू नका़ कोरोनाच्या संभावित तिसऱ्या लाटेविरुद्ध लढण्यासाठी सज्ज व्हा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य सरकार व प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले.

यासंदर्भात उच्च न्यायालयात तीन जनहित याचिका प्रलंबित असून, त्यावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अविनाश घरोटे यांच्यासमक्ष सुनावणी झाली़ दरम्यान, न्यायालयाने कोरोनाच्या संभावित तिसऱ्या लाटेला गंभीरतेने घेणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले़ कोरोनाची तिसरी लाट २ ते १८ व १८ ते ४५ वर्षे वयोगटांतील व्यक्तींना जास्त प्रभावित करेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे़ ही लाट धोकादायक ठरू नये याकरिता नवजात बाळे व लहान मुलांसाठी विशेष वॉर्ड तयार करणे, जंबो कोरोना रुग्णालय उभारणे, कस्तुरचंद पार्क, मानकापूर स्टेडियम, विविध शाळांची मैदाने, मंगल कार्यालये यासह विदर्भातील प्रत्येक जिल्हा, तालुका व ग्राम पंचायत स्तरावरील सरकारी रुग्णालयांमध्ये अतिरिक्त खाटांची व्यवस्था करण्यात यावी़ त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली व स्थानिक प्रशासनासोबत चर्चा करून प्रभावी आराखडा तयार करावा़ तसेच, राज्य सरकारने नवीन एसओपी तयार करावी़ योजना तयार करताना वाणिज्यिक ठिकाणांचा कोरोना रुग्णालय म्हणून उपयोग करू नये असे विविध निर्देशही न्यायालयाने दिले़ या प्रकरणावर आता १९ मे रोजी पुढील सुनावणी होईल़

प्लाझ्माच्या उपयोगितेवर नीरीने संशोधन करावे
कोरोना रुग्णांना प्लाझ्मा किती उपयोगी सिद्ध होतो यासंदर्भात तज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत़ यावर भिन्न-भिन्न अहवाल उपलब्ध आहेत़ त्यामुळे यासंदर्भात नीरीने संशोधन करून अहवाल सादर करावा, असा आदेश न्यायालयाने दिला़

इतर आदेश असे
रेमडेसिविर उत्पादक कंपन्यांनी त्यांना ठरवून दिलेला कोटा महाराष्ट्राला दिला की नाही, यावर राज्य सरकारने प्रतिज्ञापत्र सादर करावे़

विदर्भाला ३१ मेपर्यंत किती जीवनरक्षक औषधांची गरज भासेल आणि सध्या किती औषधे उपलब्ध आहेत याची माहिती अन्न व औषधे प्रशासनाने सादर करावी़
कोरोना रुग्णांना ऑक्सिजन देण्याकरिता खासगी सिलिंडर ताब्यात घेण्यासाठी काय कारवाई करण्यात आली याची माहिती मनपा आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांनी द्यावी.
 

Web Title: Get ready for the third wave of Corona Order of the High Court to the State Government and Administrative Officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.