आला पावसाळा, विजेचे धोके टाळा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 09:40 PM2018-06-20T21:40:26+5:302018-06-20T21:40:42+5:30
पावसाळ्यामध्ये विविधकारणांमुळे वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत असतात. मात्र अशा प्रसंगी वीजपुरवठा त्वरित सुरू करण्याच्या हेतूने ग्रामीण भागामध्ये गावातीलच अकुशल अशा खासगी वायरमनद्वारे दुरुस्तीचा प्रयत्न होत असतो. अशावेळी किरकोळ दुर्घटना होण्याबरोबरच प्रसंगी कायमस्वरूपी अपंगत्व किंवा प्राणही गमवावे लागतात. त्यामुळे खासगी वायरमनचा हस्तक्षेप टाळून अपघात न होण्याच्या दृष्टीने वीजग्राहकांनी वीजयंत्रणेपासून सावध राहावे, असे आवाहन महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पावसाळ्यामध्ये विविधकारणांमुळे वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत असतात. मात्र अशा प्रसंगी वीजपुरवठा त्वरित सुरू करण्याच्या हेतूने ग्रामीण भागामध्ये गावातीलच अकुशल अशा खासगी वायरमनद्वारे दुरुस्तीचा प्रयत्न होत असतो. अशावेळी किरकोळ दुर्घटना होण्याबरोबरच प्रसंगी कायमस्वरूपी अपंगत्व किंवा प्राणही गमवावे लागतात. त्यामुळे खासगी वायरमनचा हस्तक्षेप टाळून अपघात न होण्याच्या दृष्टीने वीजग्राहकांनी वीजयंत्रणेपासून सावध राहावे, असे आवाहन महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी केले आहे.
वादळी वारा आणि अतिवृष्टीमुळे शहरीभागासह ग्रामीण भागातही विजेच्या तारा तुटणे, लोंबकळणे, इन्सुलेटर फुटणे अशा विविध कारणांमुळे वीजपुरवठा खंडित होत असतो. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी प्रयत्नरत असतात. मात्र काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्याची सूचना वेळेवर न मिळणे किंवा यंत्रणेत बिघाड झाल्यास तो अवगत न होणे अशामुळे कर्मचारी त्या ठिकाणी पोहचण्यास उशीर होतो. अशावेळी गावातीलच एखादा खासगी वायरमन वीजपुरवठा सुरू करण्याचा अनधिकृतपणे प्रयत्न करीत असतो. अपुरे ज्ञान अथवा निष्काळजीपणामुळे अपघाताच्या घटना घडतात. भारतीय विद्युत कायदा २००३ अन्वये असे कृत्य बेकायदेशीर असल्याचे जाहीरही करण्यात आले आहे. अशा घटना घडू नयेत यासाठी वीजग्राहकांनी संबंधित भागातील लाईनमन, कनिष्ठ अभियंता यांच्याशी संपर्क साधावा. एका प्लगमध्ये अनेक पिना टाकण्याची सवय असते, ते टाळावे. त्याचबरोबर शक्य असल्यास घरामध्ये एमसीबी सर्किट बसवून घ्यावे, जेणेकरून शॉटसर्किट झाल्यास वीजपुरवठा आपोआप बंद होईल. अशाप्रकारे किमान काळजी घेतल्यास आपण विजेपासून होणाऱ्या अपघातापासुन बचाव करू शकतो.
अशी बाळगा सावधगिरी
- आकाशातील विजेचा कडकडाट होत असेल तर सर्व विद्युत उपकरणे बंद करून ते मूळ वीज कनेक्शनपासून बाजूला करावीत.
- आपल्या घरात ईएलसीबी स्वीच असणे गरजेचे आहे, जेणेकरून घरातील वीज यंत्रणेत बिघाड झाला तर वीजपुरवठा बंद होऊन जीवितहानी टाळता येईल.
- अर्थिंग सुस्थितीत असली पाहिजे. गरजेनुसार त्याची तपासणी परवानाधारक व्यक्तीकडूनच करावी.
- जमिनीवर पडलेल्या वीजतारांना स्पर्श करू नये आणि तुटलेल्या, लोंबकळणाऱ्या वीजतारांपासून सावध राहावे, तातडीने वीज कंपनीला त्याची माहिती द्यावी.
- कपडे वाळविण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या तारांचा वापर टाळावा. कारण अनावधानाने ही तार वीजप्रवाह असलेल्या तारांच्या संपर्कात आली तर मोठी दुर्घटना होऊ शकते.
- घरातील दूरचित्रवाणीची डिश किंवा अॅन्टेना वीजतारांपासून दूर ठेवावे. विद्युत उपकरणे दुरुस्त करताना मेन स्वीच बंद करावा.
- घरातील कोळी, कीटक, पाल, झुरळ, चिमण्या उबदार जागा म्हणून मीटर तसेच स्वीच बोर्डचा आश्रयाला येतात, त्यामुळे शॉटसर्किट होऊ शकते. त्यादृष्टीनेही खबरदारी घ्यावी.
- विद्युत खांबाला व ताणाला जनावरे बांधू नयेत.
- विद्युत खांबाच्या खाली गोठे किंवा कडब्याची गंजी उभारू नये.
वीज उपकरणे काळजीपूर्वक हाताळा
पावसाळयात विद्युत उपकरणे असलेली भिंत ओली असेल तर भिंतीस व अशा विद्युत उपकरणांना हात लावू नये. तसेच ओलसर हातांनी वीज उपकरणे हाताळू नयेत. अशी उपकरणे खिडकी तसेच बाल्कनीपासून दूर असावीत. त्यांना पाणी लागणार नाही याची खबरदारी घ्यावी. वीज उपकरणे हाताळताना पायात स्लिपर घालावी व वीजपुरवठा बंद झाल्याची खात्री करावी.
फ्यूजसाठी तांब्याची तार वापरू नका