भूमाफियांपासून मुक्ती द्या
By admin | Published: May 25, 2017 01:58 AM2017-05-25T01:58:59+5:302017-05-25T01:58:59+5:30
शहरात निव्वळ एकच ग्वालबन्सी भूमाफिया नसून, अनेक भूमाफियांकडून आजही लोकांची फसवणूक सुरू आहे.
संविधान चौकात धरणे : शेकडो लोकांचा सहभाग
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात निव्वळ एकच ग्वालबन्सी भूमाफिया नसून, अनेक भूमाफियांकडून आजही लोकांची फसवणूक सुरू आहे. गेल्या १० वर्षात विकसित होत असलेल्या नागपूरमुळे भूमाफियांच्या टोळ्या चांगल्याच सक्रिय झाल्या आहेत. भूमाफियांनी गुंडगिरी करून शेकडो एकर जमिनीवर बेकायदेशीररीत्या अतिक्रमण केले आहे. त्यात गरीब, निरपराध लोक भूमाफियांचे बळी पडले आहेत. कुठलीही शासकीय, प्रशासकीय यंत्रणा पीडितांना न्याय देण्यास असमर्थ ठरत आहे. शहरातील भूमाफियांपासून पीडित असलेल्या नागरिकांनी भूमाफिया पीडित जनआंदोलन उभारून संविधान चौकात धरणे दिले.
आंदोलकांनी शासनाकडे मागणी केली आहे की, भूमाफियांवर अंकुश ठेवण्यासाठी आंध्र प्रदेशातील लॅण्डग्रेविंग कायदा १९८२ महाराष्ट्र शासनानेही लागू करावा. पीडितांतर्फे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली असता, पोलीस आर्थिक फसवणूक झाल्यानंतरही अदखलपात्र गुन्हा नोंदवून भूखंडावर बेकायदेशीर कब्जा करणाऱ्यांवर काहीच कारवाई करीत नाही. पोलिसांद्वारे पीडितांना सरळ न्याय मिळावा अशी प्रशासकीय व्यवस्था करण्यात यावी. नागपूर शहर व ग्रामीणमध्ये पी.यू. लॅण्डच्या नावाने लोकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक व भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्यात येत आहे.
यावर स्वतंत्रपणे निवृत्त न्यायाधीशामार्फत समितीचे गठण करून पी.यू.च्या सर्व जमिनी पुन्हा नागरिकांच्या सुविधेसाठी तत्काळ प्रशासनाने ताब्यात घेऊन दोषींवर कारवाई करावी. भूमाफिया ग्वालबन्सी प्रकरणात गठित करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीला स्थायी स्वरूप द्यावे. आरक्षित केलेल्या परिसिमन जमिनीची माहिती नगर रचना विभागाने लिखित स्वरूपात फलकांवर प्रसिद्ध करून त्याची आराजी व त्याचा उपयोग जनतेसमोर माहितीसाठी करण्यात यावा. गेल्या सात वर्षात नागपूरमध्ये जमिनीच्या वादातून अनेकांची हत्या झालेली आहे. अनेक भूमाफिया राजकीय क्षेत्रात सर्रासपणे वावरत आहेत.
त्यामुळे प्रशासनाने पीडितांना न्याय द्यावा, अशी मागणी धरणे आंदोलनाच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली. भूमाफिया पीडित जनआंदोलनाचे अध्यक्ष दिलीप नरवडिया, कार्याध्यक्ष रवी गाडगे पाटील, सचिव ज्ञानेश्वर गुरव, नरेश निमजे यांच्या नेतृत्वात हे धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी मुकुंद घाटे, निखिल गांधी, लजित चौरिया, अशोक देशमुख, राम माकडे, सुनील खंडेलवाल, मुन्ना महाजन, राजेश जाधव, सुभाष ढबाले, राजेश श्रीवास्तव अश्वजित पाटील, महेश मामीडवार, मनोज मालविया, भगवानदास राठी, दुर्योधन निंबर्ते, मनोज अवचट आदी उपस्थित होते.