पोलीसच लावतात मटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2017 01:52 AM2017-08-06T01:52:45+5:302017-08-06T01:53:36+5:30
शहराच्या वस्त्यावस्त्यांमध्ये मटका बोकाळत चालला आहे. मटक्याच्या नादाने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत, तर काहींचे होण्याच्या मार्गावर आहे.
अल्पवयीन मुलासह महिलाही याच्या विळख्यात
कसा बसेल गुन्हेगारावर वचक?
सुमेध वाघमारे/ विशाल महाकाळकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहराच्या वस्त्यावस्त्यांमध्ये मटका बोकाळत चालला आहे. मटक्याच्या नादाने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत, तर काहींचे होण्याच्या मार्गावर आहे. केवळ युवकच नाही तर महिला आणि आता अल्पवयीन मुलांभोवती याचा विळखा घट्ट होत आहे. नागपुरात मटका बंद करायचा असेल तर पोलिसांसाठी काही तासाभराचे काम आहे. परंतु पोलीसच मटका खेळत असल्याने कारवाई कोण करणार, हा प्रश्न आहे. ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनमध्ये चक्क पोलीस शिपाई मटक्याच्या बुकीला पैसे देताना आढळून आला. यामुळे नागपुरात पोलिसांची मटक्यावरील कारवाई चेष्टेचा विषय झाल्याचे धडधडीत वास्तव आहे.
पगारात भागत नाही म्हणून खेळतो
तुम्ही पोलीस आहात, तरीही मटका खेळता या ‘लोकमत’चमूच्या प्रश्नावर तो पोलीस शिपाई जराही कचरला नाही. तो म्हणाला, या महागाईच्या जमान्यात पोलिसांना मिळणाºया पगारात भागत नाही. यामुळे मटका खेळतो आणि मीच नाही तर अनेक पोलीस कर्मचारी व अधिकारीही खेळतात, असे बिनधास्तपणे सांगितले. याच वेळी त्याला त्याच्या एका पोलीस मित्राचा मोबाईल आला, तो दाखवीत, हा घ्या पुरावा म्हणून त्याच्याशी मटक्याच्या नंबरला घेऊन चर्चा सुरू केली.
असे केले स्टिंग आॅपरेशन
टीबी वॉर्डच्या परिसरात मेडिकलचा त्वचारोग विभाग आहे. या विभागासमोर मटक्याचा बुकीचे मोठे कलेक्शन सेंटर असल्याची तक्रार ‘लोकमत’ला प्राप्त झाली. याची दखल घेत ‘लोकमत’चमूने संबंधित ठिकाणाची पाहणी केली असता राजरोसपणे मटक्याचे कलेक्शन सुरू असल्याचे दिसून आले. यात एक पोलीस शिपाईही होता. त्याने ५०० च्या तीन नोटांसोबत संभावित मटक्याच्या नंबराची चिठ्ठीही त्या बुकीच्या हाती दिली. सायकल घेऊन आलेल्या एका अल्पवयीन मुलानेही पैसे जमा केले. या बुकीकडे सायकल, मोटरसायकल, कार घेऊन लोक येत होते.
पोलिसानेच सांगितले, मटका कसा लावावा...
‘लोकमत’चमूने संबंधित पोलीस शिपायाला विश्वासात घेत मटका कसा खेळला जातो, याची माहिती विचारल्यावर त्याने कुठलेही आढेवेढे न घेता माहिती दिली. मटक्याचे नंबर लावण्यासाठी कसा अभ्यास करावा लागतो, नाही तर कसा तोटा होतो याचीही कल्पना दिली. बुकीचे नाव विचारल्यावर त्या शिपायाने ‘लंकेश’ नाव असे सांगून हा खेळ पूर्ण विश्वासावर चालत असल्याचेही सांगितले.
दहा रुपयावर शंभर तर शंभरावर थेट हजार रुपये देणारे मटक्याचे लोण विशिष्ट गल्लीपर्यंत राहिले नाही तर ते आता वस्त्यावस्त्यांमध्ये शिरले आहे. काही वस्त्यांचा सूर्यच मटक्याचा नंबर लावण्यापासून उगवत आहे.
वास्तविक शहरात किती मटका बुकी आहेत, त्याचे चालक कोण, भागीदार कोण, कोणत्या वस्तीत, गल्लीत तेथील कलेक्शन होते, हे सारे पोलिसांना माहीत असूनही ते कानाडोळा करीत आहेत. यामुळे सामान्य गरीब कष्टकºयांच्या जीवनात एकप्रकारे विष कालविण्याचाच प्रयत्न मटक्याच्या माध्यमातून होत आहे. काही जणांना यातून थोडी फार कमाई होत असेल तरीही अनेक जण देशोधडीला लागले आहेत.
मात्र, मटका चालविणारे बुकी व त्यांचे सहकारी गब्बर होत आहेत.