राष्ट्रसंतांच्या विचारांसोबत ‘स्टायपंड’ही मिळवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2019 11:17 PM2019-09-04T23:17:01+5:302019-09-04T23:20:59+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासनात अखेर यंदापासून ‘ग्रामसेवाव्रती’ हा पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे.या अभ्यासक्रमाकडे तरुण विद्यार्थी वळावेत यासाठी विद्यार्थ्यांना प्रति महिना पाच हजार रुपये ‘स्टायपेन्ड’ देण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासनात अखेर यंदापासून ‘ग्रामसेवाव्रती’ हा पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमाकडे तरुण विद्यार्थी वळावेत यासाठी विद्यार्थ्यांना प्रति महिना पाच हजार रुपये ‘स्टायपेन्ड’ देण्यात येणार आहे. यासंदर्भात बुधवारी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. ‘लोकमत’ने मागील दोन वर्षांपासून सातत्याने हा मुद्दा लावून धरला होता हे विशेष.
राष्ट्रसंतांच्या विचारांचा समाजात व तरुण पिढीत प्रचारप्रसार व्हावा या उद्देशाने हे अध्यासन स्थापन करण्यात आले. मात्र येथे तरुण विद्यार्थ्यांची संख्या हवी तेवढी नाही. राष्ट्रसंतांच्या विचारांनी प्रेरित ज्येष्ठ किंवा वयाने मोठे असलेल्या नागरिकांनी येथे प्रवेश घेतले आहेत. मात्र ३ ते ४ वर्षांनी या अध्यासनाला विद्यार्थी मिळतील की नाही, असा प्रश्न आहे. ही बाब लक्षात घेता येथे विशिष्ट वयापर्यंतच्या विद्यार्थ्यांना ‘स्टायपेन्ड’ सुरू करण्याचा कुलगुरूंचा मानस होता. ‘लोकमत’ने ही अध्यासनातील विद्यार्थ्यांच्या संख्येची बाब समोर आणल्यानंतर यासंदर्भात २०१७ साली झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मंथन झाले होते. मात्र पदव्युत्तर अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना ‘स्टायपेन्ड’ दिला तर इतर विभागांकडूनदेखील अशी मागणी होईल. त्यामुळे येथे पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात यावा व तेथील विद्यार्थ्यांना ‘स्टायपेन्ड’ द्यावा, अशी सूचना व्यवस्थापन परिषदेतर्फे करण्यात आली होती.
पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी संपूर्ण तयारी आवश्यक होती. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अभ्यास मंडळातून अभ्यासक्रम तयार करणे अनिवार्य होते. विद्यापीठात अभ्यास मंडळे अस्तित्वात आली व त्यानंतर अभ्यासक्रम निश्चित करण्यात आला. या प्रक्रियेला वर्षभराचा कालावधी लागला. यासंदर्भातील प्रस्ताव व्यवस्थापन परिषदेत मांडण्यात आला व सखोल मंथनानंतर याला मंजुरी देण्यात आली.
हजेरी असेल तरच मिळणार ‘स्टायपेंड’
वर्षभराच्या या पदविका अभ्यासक्रमात सत्रप्रणाली नसेल, तर वार्षिक प्रणाली राहणार आहे. ३० वर्षांहून कमी वय असलेल्या सर्वच विद्यार्थ्यांना प्रति महिना पाच हजार रुपये इतका ‘स्टायपेंड’ देण्यात येईल. परंतु येथे विद्यार्थ्यांना नियमित वर्ग करावे लागणार आहे. जर एखाद्या महिन्यातील हजेरी कमी असेल तर पुढील महिन्यात त्या विद्यार्थ्याला ‘स्टायपेंड’ मिळणार नाही. विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी नेल्सन मंडेला वसतिगृहात १० विद्यार्थ्यांना सर्वसाधारण दरातच प्रवेश देण्यात येणार आहेत.
राष्ट्रसंताच्या विचारांचा प्रचार-प्रसार
हा पदविका अभ्यासक्रम विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व बदलविणारा ठरणार आहे. येथे वर्गखोलीतील धड्यांसोबतच विद्यार्थ्यांना समाजाशीदेखील जोडले जाणार आहे. विविध सामुदायिक उपक्रम करणे अनिवार्य असेल. सोबतच विद्यार्थ्यांना २ ते ३ आठवडे समाजात राष्ट्रसंतांच्या विचारांचा प्रचार-प्रसारदेखील करावा लागेल, अशी माहिती कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी दिली.