लस घ्या अन् सुरक्षित व्हा..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:08 AM2021-04-02T04:08:57+5:302021-04-02T04:08:57+5:30
कळमेश्वर : कोविड प्रतिबंधात्मक लसीचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. राज्यात लसीकरण मोहिमेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. आता ४५ वर्षांवरील ...
कळमेश्वर : कोविड प्रतिबंधात्मक लसीचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. राज्यात लसीकरण मोहिमेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. आता ४५ वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीला कोविडची लस घेता येत आहे. त्यामुळे कळमेश्वर तालुक्यातील नागरिकांनी लसीकरणासाठी पुढे येत तालुका कोरोनामुक्त करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन तहसीलदार सचिन यादव यांनी केले.
कोविड लसीकरणाबाबत कळमेश्वर तालुक्यात काही मंडळी नागरिकात चुकीचे गैरसमज पसरवीत आहेत. त्यामुळे तालुक्यात लसीकरणाला पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नाही. या पार्श्वभूमीवर नागरिकांचे लसीकरणाबाबतचे गैरसमज दूर करीत तालुक्यात ही मोहीम व्यापक करण्याचा संकल्प यादव यांनी केला आहे. तालुक्यातील कोविड लसीकरणाबाबतची माहिती गुरुवारी यादव यांनी तहसील कार्यालयात आयोजित पत्रपरिषदेत दिली.
तालुक्यात आतापर्यंत १० हजार २० लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. यात ९,३७३ नागरिकांनी पहिला तर ६४७ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. आतापर्यंत कळमेश्वर ग्रामीण रुग्णालयासह तालुक्यातील चार प्राथमिक आरोग्य केंद्रावर लसीकरण सुरू होते. १ एप्रिलपासून तालुक्यातील १५ आरोग्य उपकेंद्रावरही ही सोय उपलब्ध करून देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पत्रपरिषदेला ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. प्रीती इंगळे, डॉ. संजय घोडखांदे, खंडविकास अधिकारी महेश्वर डोंगरे उपस्थित होते.
अशी आहे तालुक्याची स्थिती
कळमेश्वर तालुक्याची लोकसंख्या १ लाख २२ हजार आहे. आतापर्यंत १० हजार २० लोकांनी कोविडची लस घेतली आहे. लोकसंख्येच्या विचार करता आतापर्यंत किमान २५ टक्के म्हणजे ३० हजार नागरिकांचे लसीकरण होणे आवश्यक होते. मात्र केवळ अफवा आणि गैरसमजातून तालुक्यातील लसीकरण मोहीम मंदावल्याची खंत यादव यांनी व्यक्त केली.
- कोविड लस पूर्णपणे सुरक्षित आहे. लसीचे दोन्ही डोस पूर्ण झाल्यानंतर संबंधित व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती निश्चितच वाढेल. तो आणखी सुरक्षित होईल. त्यामुळे ४५ वर्षावरील प्रत्येकाने लस घेणे आवश्यक आहे.
- डॉ. दीपाली कुलकर्णी, आरोग्य अधिकारी
नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगता लसीकरणासाठी पुढे यावे. उलट कोविड लसीमुळे सुरक्षितता वाढली. कळमेश्वर तालुक्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी लसीकरणाचा अस्त्र म्हणून वापर होणे आवश्यक आहे. यासाठी प्रत्येक गावातील सुशिक्षित युवकांनी जनजागृती करावी.
- डॉ वर्षा पोतदार
इथे सुरू आहे लसीकरण
१ मार्चपासून कळमेश्वर ग्रामीण रुग्णालयासह चार आरोग्य केंद्रात लसीकरण सुरू होते. आता १ एप्रिलपासून तालुक्यातील कोहळी, उबाळी, तेलकामठी, लिंगा, सोनेगाव, उपरवाही, कळंबी, वरोडा, सावळी, आदासा, पारडी, परसोडी, पिपळा किनखेडे, मांडवी, सुसुंद्री, तेलगाव या उपकेंद्रावर लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. या केंद्रावर सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत लसीकरण होईल. तसेच ग्रामीण रुग्णालयात रविवार वगळता रोज सकाळी ९ ते सांयकाळी ५ पर्यंत लसीकरण होईल.