घाटंजीला पुन्हा अंधश्रध्देचा डंख

By admin | Published: May 7, 2014 02:15 AM2014-05-07T02:15:30+5:302014-05-07T14:05:29+5:30

यवतमाळ सपना पळसकरच्या नरबळीने शरमेने मान खाली घालाव्या लागणाऱ्या सामाजिक न्यायमंत्र्यांच्या मतदारसंघात पुन्हा अंधश्रद्धेचा अघोरी प्रकार उघडकीस आला.

Ghatanjiya again in the blind eye | घाटंजीला पुन्हा अंधश्रध्देचा डंख

घाटंजीला पुन्हा अंधश्रध्देचा डंख

Next

संतोष अरसोड 

यवतमाळ सपना पळसकरच्या नरबळीने शरमेने मान खाली घालाव्या लागणाऱ्या सामाजिक न्यायमंत्र्यांच्या मतदारसंघात पुन्हा अंधश्रद्धेचा अघोरी प्रकार उघडकीस आला. महिलेच्या अंगातील भूत काढण्यासाठी चक्क स्मशानात अन् तेही पुरलेल्या प्रेताच्या साक्षीने प्रकार सुरू होता. नागरिकांच्या सतर्कतेने मांत्रिकांना गजाआड व्हावे लागले. जादूटोणा विरोधी कायद्याचे ‘सत्य’रूप प्रत्यक्षात आणण्याचे क्रेडिट घेणाऱ्यांच्याच तालुक्यात वारंवार असे प्रकार का घडावेत हा चिंतनाचा नव्हे चिंतेचा विषय होऊ पाहत आहे. घाटंजीच्या घाटी स्मशानभूूमीत ११.३० वाजताच्या सुमारास सहा जण एका पुरलेल्या प्रेताजवळ अघोरी पूजा करताना लक्षात आले. बायकोला भूतबाधा झाल्याचा गैरसमज करून नवरोबानेच काही मांत्रिकांकरवी हा प्रकार केला. मात्र नागरिकांच्या दक्षतेमुळे चार आरोपी गजाआड झाले. जादूटोणाविरोधी कायद्यानुसार गुन्हाही दाखल झाला. पोलीस त्यांचे काम करतीलही. पण असे प्रकार आणखी किती दिवस चालणार?

राज्यात जादूटोणाविरोधी कायदा लागू झाला. त्यापूर्वी सपना पळसकर नरबळी प्रकरणाने आमची मान शरमेने खाली गेली. घाटंजी सामाजिक न्यायमंत्री अ‍ॅड. मोघे यांच्या मतदारसंघात येते. नरबळी प्रकरणाने व्यथित झालेल्या सामाजिक न्यायमंत्र्याना जादूटोणाविरोधी कायदा पास व्हावा, असे मनापासून वाटत होते, असे म्हणणे धाडसाचे होईल. डॉ. दाभोलकरांचा खून झाल्यानंतर लोकांचा रोष कमी व्हावा म्हणून विधेयक पास झाले. मोघे यांनी या कायद्याच्या मंजुरीचे पुरोगामी स्टाईलने क्रेडिट घेतले. मात्र त्यांच्याच मतदारसंघात कायद्याची सामाजिक व मानवीय बाजूू पटवून देण्यात मोघे यांना अपयश आल्याचे पुन्हा एकदा सिध्द केले आहे. सामाजिक न्यायमंत्री म्हणून अ‍ॅड.शिवाजीराव मोघे यांच्यावर आता विचार करण्याची वेळ आली आहे. सपना पळसकर प्रकरणाची शाई वाळते न वाळते तोच पुन्हा स्मशानात अघोरी प्रकार घडावेत, याची नैतिक जबाबदारी कुणाची आहे. सर्वांनाच आत्मचिंतन करणे गरजेचे आहे.

सपना पळसकर नरबळी प्रकरणाने घाटंजी तालुक्याची नकारात्मक महिमा सार्‍या महाराष्ट्रभर पोहोचली. कळंब येथील बाबाच्या नादी लागल्याने एका अभियंत्याला आपल्या बायकोचा जीव गमवावा लागला. त्यानंतर वणी तालुक्यातील बोर्डा येथे करणीच्या संशयावरून मानवी विष्ठा चारण्याचा घृणास्पद प्रकार घडला. एक दोन महिने झाले की जिल्ह्यात अंधश्रध्दांची बजबजपुरी माजल्याच्या निर्लज्ज घटना समोर येतात. काही घटनांची बोंब होत नाही. एकंदरीत कायदे करा की काही करा आम्ही आमच्या नालायकीवर कायम आहोत, हे सांगण्याची धडपड मात्र कायम असते.

Web Title: Ghatanjiya again in the blind eye

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.