सर्पमित्राच्या मदतीने पकडला घोणस आणि धामण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:08 AM2021-09-21T04:08:38+5:302021-09-21T04:08:38+5:30
नागपूर : शहरात दोन ठिकाणी निघालेल्या सापांना सर्पमित्राच्या मदतीने पकडण्यात यश आले. यातील एक साप अतिविषारी घोणस जातीचा आहे. ...
नागपूर : शहरात दोन ठिकाणी निघालेल्या सापांना सर्पमित्राच्या मदतीने पकडण्यात यश आले. यातील एक साप अतिविषारी घोणस जातीचा आहे.
पहिल्या घटनेत बेसा बेलतरोडी येथील कबीरा कॉन्व्हेंटच्या मागे राहणारे चतुर वर्मा यांच्या घरी घोणस (रसेल वायपर) जातीचा अतिविषारी साप निघाला. पाच वर्षाची लहान मुलगी सकाळी अंगणात खेळत असताना आईला साप दिसला. त्याला अंगणाबाहेर हाकलण्याच्या प्रयत्नात तो सरपणासाठी ठेवलेल्या लाकडांच्या ढिगाऱ्यात दडला. सायंकाळच्या सुमारास पुन्हा तो बाहेर येऊन मुलीच्या पायाजवळ आल्याचे दिसताच हा प्रकार लक्षात आला. नागरिकांनी सर्पमित्र शुभम पराळे यांना मोबाईलवरून संपर्क साधून मदतीसाठी बोलावले. लाकडे बाजूला सारून सापाला बाहेर काढून पकडले. पाच फूट लांबीच्या या सापाच्या पोटात पिले असल्याचे लक्षात आले. त्याला पकडून वनविभागाच्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरला माहिती देऊन वनविभागाच्या स्वाधीन केले.
याच वेळी सायंकाळी दुसरी घटना बायपास रोडवरील पांगरी टोल टॅक्समध्ये घडली. तिथे असलेल्या वायरिंगमध्ये काळ्या रंगाचा सहा फूट लांबीचा धामण साप दडून होता. कर्मचाऱ्यांच्या लक्षात हा प्रकार आल्यावर त्यांनी शुभम पराळे यांना संपर्क साधून बोलावले. त्यांनी सापाला पकडून नंतर निसर्गमुक्त केले.
...
बेसा बेलतरोडी परिसरात संख्या अधिक
शहरातील बेसा, बेलतरोडी, मनीषनगर, चिचभवन या भागात रसेल वायपर हा साप अधिक प्रमाणात आढळतो. हा साप भुसभुशीत जमिनीवर वावरत असल्याने हा परिसर त्याच्या अधिवासासाठी पोषक आहे. त्यामुळे या परिसरात हे साप मोठ्या प्रमाणात पकडण्यात आले आहेत.
...