मेडिकलमध्ये अवतरले ‘भूत’!
By admin | Published: April 11, 2017 01:45 AM2017-04-11T01:45:01+5:302017-04-11T01:45:01+5:30
तारीख ७ एप्रिल २०१७...रात्री १.३० वाजता...रुग्णालयात शुकशुकाट... रुग्ण, मृतदेहांना घेऊन जाणारे रिकामे स्ट्रेचर व्हरांड्यात उभे असलेले...
सीसीटीव्हीमध्ये कैद : सोशल मीडियावर झाले व्हायरल
नागपूर : तारीख ७ एप्रिल २०१७...रात्री १.३० वाजता...रुग्णालयात शुकशुकाट... रुग्ण, मृतदेहांना घेऊन जाणारे रिकामे स्ट्रेचर व्हरांड्यात उभे असलेले...अचानक एक स्ट्रेचर चालायला लागले...थोडे सामोर जाऊन थांबले... मागे आले... आणि धडकन सामोर जाऊन एका खांबावर आदळले...नंतर एक कर्मचारी आला...एका खोलीला कुलूप लावले...आणि एका उभ्या स्ट्रेचरला हात लावणार तोच ते स्ट्रेचर चालायला लागले...तो कर्मचारी घाबरला...पळायला लागला...तिथे दुसरे-तिसरे कोणीच नव्हते! काय होते हे भूताटकी, चेटूक की भास. मात्र हे सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले...सोशल मीडियावर व्हायरल झाले. या व्हिडीओमुळे मेडिकलच्या कर्मचाऱ्यांची पाचावर धारण बसली आहे.
नागपूरच्या मेडिकल रुग्णालयात भूत असल्याची अफवा नवी नाही. यापूर्वीही अनेक अफवा पसरल्या. काही आजही बोलल्या जातात. गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेल्या अधिष्ठात्यांच्या बंगल्याला आजही ‘भूतबंगला’ म्हणून ओळख आहे. रात्रीच्यावेळी शवागाराच्या रस्त्याने कोणीच जात नाही. दिवसाढवळ्या रुग्णालयाच्या आतही अमूक रस्त्यातून गेल्यास झपाटल्यासारखे होते, असे खुद्द कर्मचारी सांगतात. या गोष्टीवर कोणी त्यांना वेडं ठरवितात तर कोणी हसण्यावर नेतात.
विशेष म्हणजे, दुसऱ्या एका व्हिडीओत लोखंडाची शिडी अचानक चालायला लागते आणि काही अंतर गेल्यावर थांबते. हे दोन्ही व्हिडीओ गेल्या दोन दिवसांपासून व्हॉटस् अॅपवर धुमाकूळ घालत आहे. वैद्यकीय अधीक्षकांपासून ते अधिष्ठात्याप्ांर्यंत याची चर्चा आहे. मात्र दोन-तीन वेळा भूताचा हा व्हिडीओ बघितल्यानंतर मेडिकलचा परिसर नाही, असे म्हणून हसण्यावर नेले जात आहे. मग हा व्हिडीओ कुठला. काही दिवसांपूर्वी हाच व्हिडीओ जे.जे.रुग्णालयातील असल्याचे मुंबईत व्हायरल झाले होते. मात्र हा व्हिडीओ रुग्णालयाचा नाही. जे.जे.रुग्णालयात भूत असल्याची अफवा पसरवली जात आहे, हे सांगण्यास येथील अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांना सामोर यावे लागले. आता हाच व्हिडीओ मेडिकलमधील असल्याचे सांगून ‘भूतासारखे’ व्हॉटस् अॅपवर फिरत आहे. याला घेऊन रुग्णालयात चर्चेला पेव फुटले आहे. गेल्या दोन दिवसांपासून रात्रीच्यावेळी रुग्णालयात बिनधास्त फिरणारे रुग्णाचे नातेवाईक एकटे-दुकटे फिरत नसल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)
तयार केलेला व्हिडीओ
सीसीटीव्ही सॉफ्टवेअरच्या एका तज्ज्ञाच्या मते हे सीसीटीव्हीचे फुटेज नाही. हा व्हिडीओ तयार केला आहे. कारण सीसीटीव्ही हलत नाही. दुसरे म्हणजे एका व्हिडीओला संगीतही दिले आहे. ही केवळ अफवा आहे.