नागपूरच्या अजब बंगल्याचे भूत उतरले; ‘ती’ वादग्रस्त निविदा रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 08:36 PM2017-11-29T20:36:39+5:302017-11-29T20:39:38+5:30

राज्य सरकारच्या निर्णयाचा सोयीपुरता वापर करू इच्छिणाऱ्या  नागपूर मध्यवर्ती संग्रहालय (अजब बंगला) प्रशासनाचे भूत अखेर उतरले. मध्यवर्ती संग्रहालय प्रशासनाने ६ नोव्हेंबर रोजी जारी केलेली आॅनलाईन निविदा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

The ghost of Nagpur's Ajab Bangla comes down ! ; Controversial tender cancellation | नागपूरच्या अजब बंगल्याचे भूत उतरले; ‘ती’ वादग्रस्त निविदा रद्द

नागपूरच्या अजब बंगल्याचे भूत उतरले; ‘ती’ वादग्रस्त निविदा रद्द

Next
ठळक मुद्देआता नव्याने होणार निविदा प्रक्रिया

आॅनलाईन लोकमत
नागपूर : राज्य सरकारच्या निर्णयाचा सोयीपुरता वापर करू इच्छिणाऱ्या  नागपूर मध्यवर्ती संग्रहालय (अजब बंगला) प्रशासनाचे भूत अखेर उतरले. मध्यवर्ती संग्रहालय प्रशासनाने ६ नोव्हेंबर रोजी जारी केलेली आॅनलाईन निविदा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘लोकमत’ने अजब बंगल्यात गजब गोलमाल या मालिकेअंतर्गत येथील आॅनलाईन निविदा प्रक्रियेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. याची दखल घेत मध्यवर्ती संग्रहालयाचे अभिरक्षक डॉ.विराग सोनटक्के यांनी निविदा प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला.
आऊटसोर्सिंगने (बाह्ययंत्रणेद्वारे) करावयाच्या पदभरतीसंदर्भात अभिरक्षक मध्यवर्ती संग्रहालय प्रशासनाने दिलेली पहिली निविदा तांत्रिक पेचात फसली होती. ही निविदा वादग्रस्त असल्याचा आरोप बेरोजगार सेवासहकारी संस्थांनी केला होता. यानंतर प्रशासनाने दुसरी निविदा जारी केली होती. मात्र दुसऱ्या  निविदेत (अवैध निविदा) पहिल्या निविदेच्या मूळ प्रारूपात बदल करण्यात आल्याने अडचणीत आली होती.
राज्य सरकारच्या शासन निर्णय क्रमांक सीएटी २०१७ /प्र क्र ८/इमा-२ चा मध्यवर्ती संग्रहालयाने आपल्या सोयीपुरता उपयोग केल्याचा आरोप नागपुरातील बेरोजगार संघटनांकडून करण्यात आला होता.
मध्यवर्ती संग्रहालयाने ६ नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या आॅनलाईन निविदेच्या अटीत व शर्तीत बदल केला होता. याही निविदेत संग्रहालयाने समन्वयक (सहायक अभिरक्षक) हे पद भरावयाचे असल्याचा उल्लेख केला होता. मात्र या पदाचे देय वेतन किती असेल, याचा उल्लेख नव्हता. याचा मूळ निविदेत मात्र उल्लेख आहे. त्यामुळे कंत्राटदार निविदा सादर करताना गोंधळात पडले होते.

नियम काय सांगतो?
मुळात शासन निर्णय १२ एप्रिल २०१७ नुसार दुसरी निविदा काढताना मूळ प्रारूप निविदेमध्ये कुठलाही बदल करू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे. मूळ प्रारूप निविदेत कुठलाही बदल न केल्यास नवीन केलेली मागणी ही द्वितीय मागणी समजण्यात येईल, असेही यात नमूद करण्यात आले आहे. मात्र ६ नोव्हेंबर २०१७ मध्यवर्ती संग्रहालयाने जारी केलेल्या निविदेत अटी-शर्र्ती आणि मूळ प्रारूपात बदल करण्यात आला होता. त्यामुळे या निविदेची ही दुसरी वेळ होती, असे म्हणणे तांत्रिकदृष्ट्या चुकीचे होते. कायदेशीररीत्या ही निविदा प्रथमच हवी होती. असे असतानाही ६ नोव्हेंबर २०१७ रोजी जारी केलेल्या आॅनलाईन निविदेच्या आधारावर मध्यवर्ती संग्रहालयाकडे दोन कंत्राटदारांनी निविदा सादर केल्या होत्या. यात नागपुरातील पंचदीप विकास सेवा सहकारी संस्थेला आऊटसोर्सिंग पद्धतीने मनुष्यबळ पुरविण्याचे कंत्राट देण्यात आले होते. ते आता अधिकृतरीत्या रद्द करण्यात आले आहे.
‘मध्यवर्ती संग्रहालय प्रशासनाने ६ नोव्हेंबर रोजी जारी केलेली आॅनलाईन निविदा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या निविदा प्रक्रियेत तांत्रिक चुका झाल्या आहेत. त्यामुळे सरकारच्या सर्व नियमांचा अभ्यास करीत सुधारित निविदा जारी करण्यात येईल.’
- डॉ.विराग सोनटक्के
अभिरक्षक, मध्यवर्ती संग्रहालय

 

Web Title: The ghost of Nagpur's Ajab Bangla comes down ! ; Controversial tender cancellation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.