भुते यांनी जमा केले २ कोटी
By admin | Published: January 7, 2016 03:38 AM2016-01-07T03:38:26+5:302016-01-07T03:38:26+5:30
ताजश्री समूहाचे संचालक अविनाश रमेश भुते यांनी एमपीआयडी कायद्याच्या विशेष न्यायालयाला दिलेल्या हमीनुसार बुधवारी २ कोटी रुपये न्यायालयात जमा केले.
जामीन अर्जही सादर : ८ जानेवारी रोजी सुनावणी
नागपूर : ताजश्री समूहाचे संचालक अविनाश रमेश भुते यांनी एमपीआयडी कायद्याच्या विशेष न्यायालयाला दिलेल्या हमीनुसार बुधवारी २ कोटी रुपये न्यायालयात जमा केले. भुते यांनी ही रक्कम भरण्यासंदर्भात मंगळवारी हमीपत्र सादर केले होते. यासोबतच भुते यांनी सदर न्यायालयात जामीन अर्जही दाखल केला आहे. अर्जावर ८ जानेवारी रोजी सुनावणी निश्चित करण्यात आली आहे.
गुंतवणुकदारांची फसवणूक करणारा महाठग प्रशांत वासनकरची संगत भुते यांना भोवली आहे. वासनकरचे लाभार्थी असल्याच्या आरोपावरून गुन्हेशाखेच्या पथकाने सोमवारी भुते यांना अटक केली आहे. पोलिसांना तपासात वासनकरच्या लाभार्थ्यांची यादी मिळाली आहे. त्यावरून भुते, चावला व राठी यांची चौकशी करण्यात येत आहे. वासनकरने भुतेंच्या खात्यात ९ कोटी २० लाख रुपये तर, चावला व राठी यांच्या खात्यातही काही लाख रुपये वळते केले होते. चावला व राठी यांनी लगेच रक्कम जमा करण्याची तयारी दाखवली होती.
भुते मात्र टाळाटाळ करीत होते. पोलिसांना भुते यांच्याकडून व्याजासह १३ कोटी ५० लाख रुपये वसूल करायचे आहेत.
पोलिसांची कारवाई सुरू झाल्यानंतर भुते यांनी दोन कोटी रुपये जमा करण्याची हमी दिली होती. भुते यांच्यातर्फे अॅड. अक्षय नाईक व अॅड. प्रदेश रणदिवे कामकाज पहात आहेत. (प्रतिनिधी)