भुते यांची कारागृहात रवानगी

By admin | Published: January 6, 2016 03:51 AM2016-01-06T03:51:23+5:302016-01-06T03:51:23+5:30

गुंतवणूकदारांची कोट्यवधीने फसवणूक करणाऱ्या वासनकर वेल्थ मॅनेजमेन्टला बेकायदेशीररीत्या मदत केल्याप्रकरणी ताजश्री समूहाचे सर्वेसर्वा अविनाश रमेश भुते यांनी ...

Ghosts release prison | भुते यांची कारागृहात रवानगी

भुते यांची कारागृहात रवानगी

Next

दोन कोटी रुपये भरण्याचे न्यायालयात हमीपत्र :
पोलिसांचे पीसीआर घेण्याचे स्वातंत्र्य अबाधित ठेवून सुनावला एमसीआर
नागपूर : गुंतवणूकदारांची कोट्यवधीने फसवणूक करणाऱ्या वासनकर वेल्थ मॅनेजमेन्टला बेकायदेशीररीत्या मदत केल्याप्रकरणी ताजश्री समूहाचे सर्वेसर्वा अविनाश रमेश भुते यांनी एमपीआयडी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. टी. सूर्यवंशी यांच्या न्यायालयात ११ जानेवारीपर्यंत दोन कोटी रुपये भरण्याचे हमीपत्र सादर केले. त्यामुळे न्यायालयाने तपास अधिकाऱ्याचे पोलीस कोठडी रिमांडच्या मागणीचे स्वातंत्र्य अबाधित ठेवून भुते यांना न्यायालयीन कोठडी रिमांड सुनावून त्यांची मध्यवर्ती कारागृहाकडे रवानगी केली.
प्रकरण असे की, आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून ५१५ गुंतवणूकदारांची १४३ कोटी ४ लाख ६८ हजार २५४ रुपयांनी लुबाडणूक केल्याप्रकरणी वासनकर वेल्थ मॅनेजमेंटविरुद्ध ९ मे २०१४ रोजी अंबाझरी पोलीस ठाण्यात भादंविच्या ४२०, ४०६, ५०६, १२० (ब), ४०९ आणि एमपीआयडी कायद्याच्या कलम ३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घोटाळ्याचा तपास करणाऱ्या यंत्रणेने प्रशांत वासनकर, विनय वासनकर, भाग्यश्री वासनकर, मिथिला वासनकर, अभिजित चौधरी आणि सरला वासनकर यांच्या बँक खात्यांचे अवलोकन केले असता, या सर्व आरोपींनी लबाडीने १६ मार्च २०१३ ते २२ नोव्हेंबर २०१३ या कालावधीत भुते यांच्या ताजश्री समूहाच्या बँक खात्यात ९ कोटी १९ लाख ८५ हजार रुपयांची रक्कम आरटीजीएसमार्फत जमा केल्याचे दिसून आले होते. वस्तुत: ही रक्कम या सर्व आरोपींची भविष्यात कामी येणारी सुरक्षित रक्कम होती.
ही रक्कम तपास यंत्रणेला जप्त करता येऊ नये, म्हणून भुते यांनी वासनकर यांना अवैधरीत्या मदत करण्याच्या हेतूने बनावट दस्तऐवज तयार केले. न्यायालय, तपास यंत्रणा आणि सरकारची फसवणूक केली. त्यामुळे अविनाश भुते यांच्याव्२िारुद्ध भांदविच्या १०९ कलमान्वये गुन्हा दाखल करून सरकार पक्षाच्या वतीने त्यांच्या पाच दिवसांच्या पोलीस कोठडी रिमांडची मागणी करण्यात आली होती. बचाव पक्षाने पोलीस कोठडी रिमांडला विरोध केला. भुते खुद्द लाभार्थी असल्याचे त्यांच्या वकिलाचे म्हणणे होते. सोमवारी ११ जानेवारीपर्यंत दोन कोटींची रोख रक्कम न्यायालयात जमा करीत असल्याचे हमीपत्र लिहून दिले.
न्यायालयाने खडसावले
आरोपीने न्यायालयात दोन कोटी रुपये भरण्याची तयार दर्शविताच आरोपीने यापूर्वीही असेच आश्वासन दिल्याने न्यायालयाने त्यांना चांगलेच खडसावले. वासनकरची रक्कम भुतेंच्या खात्यात कशी, या प्रश्नाने संपूर्ण तपास यंत्रणेत खळबळ उडाली होती. या लबाडीमुळे भुते यांच्याकडून व्याजासह १३ कोटी ७१ लाख १७ हजार २०० रुपये वसूल केले जावे, अशी मागणी यापूर्वीच सरकार पक्षाने न्यायालयाकडे केली होती. या रकमेच्या वसुलीसाठी २९ आॅगस्ट २०१५ रोजी गुन्हे शाखेच्या आर्थिक पथकाने भुते यांच्या प्रतिष्ठानांवर धाडी घातल्या होत्या. त्यात केवळ ९ लाख ७९ हजाराची रोख रक्कम जप्त झाली होती. भुते यांच्या सर्व मालमत्ता सील करण्याची प्रक्रिया पोलीस पथकाने सुरू केली असता, भुते यांनी ९ कोटी १९ लाखांची रक्कम आपल्या खात्यात आल्याची कबुली देऊन पैसे भरण्यासाठी मुदत तपास यंत्रणेला मागितली होती. त्यानंतर खुद्द भुते न्यायालयात गेले होते.
त्यांनी घूमजाव करीत ही रक्कम आपण वासनकर कंपनीकडे केलेल्या गुंतवणुकीच्या परताव्याची असल्याचे सांगितले होते. वासनकरकडे २००९ मध्ये २ कोटी, २०१० मध्ये १ कोटी गुंतवले होते. एकूण ३ कोटींचे ८ कोटी रुपये आणि २०१५ पर्यंत ११ कोटी रुपये आपणाला मिळणार होते, असेही त्यांनी सांगितले होते. परंतु या व्यवहाराशी संबंधित कोणतेही पुरावे त्यांनी सादर केले नव्हते. पुढे शपथपत्र दाखल करून ११ कोटींपैकी ३ कोटी रुपये आपल्या गुंतवणुकीचे असून केवळ ७ कोटींची रक्कम आपल्याला द्यायची आहे. ही रक्कम २०१७ पर्यंत परत करण्याची आपणास अनुमती देण्यात यावी, अशी विनंती त्यांनी करून आपल्या मालमत्ता सील करू नये, अशी विनंती केली होती. पुढे त्यांनी हा विनंती अर्जही मागे घेतला होता. मंगळवारी न्यायालयात सरकारच्यावतीने जिल्हा सरकारी वकील विजय कोल्हे, अतिरिक्त सरकारी वकील कल्पना पांडे, अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील नितीन तेलगोटे, गुंतवणूकदारांच्या वतीने अ‍ॅड. बी. एम. करडे, अ‍ॅड. मोहन अरमरकर आरोपीच्यावतीने अ‍ॅड. अक्षय नाईक यांनी काम पाहिले. आर्थिक गुन्हे पथकाचे पोलीस निरीक्षक तपास अधिकारी सुधाकर ढोणे यांनी आरोपी अविनाश भुते यांना न्यायालयात हजर केले होते. उद्या बुधवारी न्यायालयात भुते यांचा जामीन अर्ज दाखल होणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Ghosts release prison

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.