रविभवनातील रिकाम्या कॉटेजवर दिग्गजांची नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2019 12:54 AM2019-12-15T00:54:16+5:302019-12-15T00:55:05+5:30
अनेक दिग्गज आमदारांची रिकाम्या असलेल्या रविभवनातील कॉटेजवर नजर आहे. काहींनी कॉटेज मिळावे, अशी मागणीही केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात केवळ सहा मंत्र्यांचा समावेश असल्याने रविभवन रिकामे पडले आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष, मंत्री व विरोधी पक्षनेते राहिलेल्या अनेक दिग्गज आमदारांची राहण्याची व्यवस्था आमदार निवासात करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत अनेक दिग्गज आमदारांची रिकाम्या असलेल्या रविभवनातील कॉटेजवर नजर आहे. काहींनी कॉटेज मिळावे, अशी मागणीही केली आहे.
रविभवनातील कॉटेज हे मंत्र्यांसाठी आहेत. रिकाम्या कॉटेजसंदर्भात निर्णय घेण्यासाठी रविवारी विधिमंडळाची उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत गृहमंत्री एकनाथ शिंदे व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित राहतील. या बैठकीत रविभवनातील रिकामे कॉटेज वरिष्ठ आमदारांना द्यायचे की नाही, यावर निर्णय घेतला जाईल. दुसरीकडे सूत्रानुसार रविभवनातील रिकामे कॉटेज त्या दिग्गज आमदारांना मिळण्याची शक्यता आहे, ज्यांना उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात संधी मिळण्याची शक्यता आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री रामदास कदम, विजय वडेट्टीवार, दिवाकर रावते यासारख्या नेत्यांना रविभवनातील रिकामे कॉटेज मिळण्याची शक्यता सूत्रांनुसार नाकारता येत नाही.
सुविधा मात्र आमदारांच्याच मिळणार
दिग्गज आमदारांना रविभवनातील रिकामे कॉटेज देण्याचा निर्णय झाला तरी त्यांना सुविधा मात्र आमदारांच्याच मिळतील. विशेष म्हणजे प्रोटोकॉलनुसार मंत्र्यांना शासकीय सुविधा मिळतात. आमदारांचा प्रोटाकॉल हा वेगळा असतो. तेव्हा कॉटेज मिळाले तरी त्यांना मंत्र्यांना मिळणाऱ्या सुविधा मिळणार नाहीत. दरम्यान अनेक मोठ्या नेत्यांच्या राहण्याची व्यवस्था शहरातील हॉटेलांमध्ये झालेली आहे.