सणासुदीत प्रवाशांना गिफ्ट; मध्य रेल्वेच्या चार फेस्टिव्हल सुपर फास्ट स्पेशल ट्रेन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2022 03:48 PM2022-09-28T15:48:25+5:302022-09-28T15:51:24+5:30
गर्दी आणि गैरसोय टाळण्यासाठी प्रयत्न
नागपूर : दिवाळी आणि छटपूजाच्या निमित्ताने रेल्वेगाड्यांमध्ये प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने चार साप्ताहिक सुपरफास्ट रेल्वेगाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सणासुदीत रेल्वेने प्रवाशांना दिलेली ही एक चांगली भेट मानली जाते.
गणेशोत्सवानंतर बाहेरगावी जाणाऱ्यांची संख्या अचानक वाढते. दसरा आणि दिवाळीत ती मोठी होते. प्रत्येक रेल्वेगाडीत त्यामुळे मोठी गर्दी होते. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते. एकमेकांना खेटून, उभे राहून प्रवास करावा लागतो. ते लक्षात घेता मध्य रेल्वेने चार फेस्टिव्हल स्पेशल ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पुढीलप्रमाणे आहेत.
मुंबई-नागपूर साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल ट्रेन नंबर ०१०३३ ही २२ ऑक्टोबर आणि २९ ऑक्टोबरला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून मध्यरात्री १२.२० ला प्रस्थान करेल आणि त्याच दिवशी दुपारी ३.३२ वाजता नागपूर स्थानकावर येईल.
०१०३४ ही रेल्वेगाडी २३ आणि ३० ऑक्टोबरला दुपारी १.३० वाजता नागपूर स्थानकावरून निघेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ४.१० वाजता मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचेल.
या रेल्वेगाड्या जाता-येताना दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगांव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामनगाव आणि वर्धा रेल्वेस्थानकावर थांबणार आहेत. या गाडीला दोन एसी टू टियर, ८ एसी ३ टियर, चार शयनयान श्रेणी, ५ सामान्य द्वितीय श्रेणी तसेच गार्ड ब्रेक व्हॅन आणि जनरेटर व्हॅनचा समावेश राहील. या सर्व गाड्यांच्या आरक्षणाची सोय सर्व संगणकीय आरक्षण केंद्रांवर तसेच रेल्वेच्या वेबसाइटवर सुरू झाली आहे.