गिरधारीलाल अग्रवालचा अटकपूर्व जामीन फेटाळला
By admin | Published: December 26, 2015 03:49 AM2015-12-26T03:49:10+5:302015-12-26T03:49:10+5:30
लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खंडणीप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. एस. तरारे यांच्या न्यायालयाने
न्यायालय : खंडणी प्रकरण
नागपूर : लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खंडणीप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. एस. तरारे यांच्या न्यायालयाने आरोपी वर्धमाननगर येथील रहिवासी गिरधारीलाल अग्रवाल याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला.
स्माल फॅक्टरी एरिया येथील रहिवासी संतोष ऊर्फ बंटी रामपाल शाहू याच्या तक्रारीवरून लकडगंज पोलिसांनी गिरधारीलाल अग्रवाल आणि अन्य लोकांविरुद्ध भादंविच्या ३८४, ३८६, १४३, शस्त्र कायद्याच्या ३/२५ कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. तक्रारकर्त्यानुसार तो सप्टेंबर २०१५ च्या दुसऱ्या आठवड्यात आपल्या दुकानाकडे जात असताना गिरधारीलाल आणि अन्य लोकांनी त्याला थांबविले. त्याला एमएच-३१-एई-०६०६ क्रमांकाच्या पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये बसविले. रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून आणि जीवे मारण्याची धमकी देऊन दरमहा ५० हजाराच्या खंडणीची मागणी केली. गिरधारीलालसोबत असलेल्या मुकेश शाहू याने रिव्हॉल्व्हर लावून १ लाख २५ हजार रुपये किमतीची गळ्यातील सोन्याची चेन आणि खिशातील २० हजार रुपये रोख हिसकावून घेतले. १ आॅक्टोबर २०१५ रोजी गिरधारीलाल याला ५० हजाराची खंडणी दिली, असा आरोपही फिर्यादीने केला होता.
आरोपी गिरधारीलाल याच्यावतीने युक्तिवाद करताना अॅड. चेतन ठाकूर यांनी न्यायालयाला सांगितले की, गिरधारीलाल हा संतोष शाहू याच्याविरुद्ध दाखल एका फौजदारी प्रकरणात साक्षीदार होता. फिर्यादीने गुन्हा नेमका कोणत्या दिवशी घडला, याचा उल्लेख केलेला नाही. मुख्य आरोपी मुकेश शाहू याला अटक झालेली आहे. आरोपी गिरधारीलालकडून पोलिसांना काहीही जप्त करणे नाही. त्यामुळे आरोपीला जामीन मंजूर करण्यात यावा. सरकार पक्षाने जामिनास विरोध केला. तो प्रथमदर्शनी गुन्ह्यात सहभागी असल्याचे दिसते, त्यामुळे पोलीस कोठडीत आरोपीची विचारपूस आवश्यक आहे. ७० हजार रुपये रोख आणि सोन्याची चेन अद्यापही जप्त झालेली नाही. प्रकरण गंभीर आहे. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून आरोपी गिरधारीलाल अग्रवाल याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला.
न्यायालयात सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील प्रशांत साखरे, फिर्यादीच्या वतीने अॅड. विनायक डोंगरे यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)