अशोक बेलखोडे यांना गिरीश गांधी सामाजिक पुरस्कार जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:07 AM2021-05-20T04:07:38+5:302021-05-20T04:07:38+5:30
नागपूर : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अशोक बेलखोडे यांना या वर्षीचा ‘डॉ. गिरीश गांधी राष्ट्रीय सामाजिक पुरस्कार’ जाहीर करण्यात ...
नागपूर : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अशोक बेलखोडे यांना या वर्षीचा ‘डॉ. गिरीश गांधी राष्ट्रीय सामाजिक पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार त्यांना २३ जुलै रोजी प्रदान केला जाईल, अशी माहिती सी.मो. झाडे फाउंडेशनचे विश्वस्त नारायण समर्थ यांनी दिली.
फाउंडेशनतर्फे नागपुरात चालविल्या जाणाऱ्या सत्यनारायण नुवाल गुरुकुल व्यसनमुक्ती केंद्राच्या वतीने सामाजिक कार्य करणाऱ्या उल्लेखनीय व्यक्ती व संस्थांना हा पुरस्कार दिला जातो. १ लाख रुपये व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. २०१३ पासून सुरू करण्यात आलेला हा पुरस्कार आतापर्यंत डॉ. एस.एन. सुब्बाराव, डॉ. कुमार सप्तर्षी, रवी कालरा, डॉ. रवी व डॉ. स्मिता कोल्हे, डॉ. अलका सरमा, संजय नहार, डॉ. सतीश गोगुलवार व शुभदा देशमुख यांना प्रदान करण्यात आला आहे. डॉ. अशोक बेलखोडे यांनी ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांच्या प्रेरणेने नांदेड जिल्ह्यातील आदिवासीबहुल असलेल्या किनवट तालुक्यात साने गुरुजी रुग्णालयाची स्थापना केली आहे. भारत जोडो युवा अकादमीच्या माध्यमातून हा प्रकल्प चालविण्यात येतो. रुग्णसेवा आणि आदिवासींच्या सामाजिक पुनर्वसनासाठी डॉ. बेलखोडे गेली तीन दशके समर्पित भावनेने कार्य करत आहेत.
.................