गिरीश कर्नाडांची मिश्किली, नागपूरभेटीचे हृद्य संस्मरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 09:13 PM2019-06-10T21:13:10+5:302019-06-10T21:18:31+5:30
रंगभूमीसह लेखन आणि अभिनयकलेच्या क्षेत्रात उमटवलेला कर्तृत्वाचा अभेद्य ठसा, नाटकातील स्त्री व्यक्तिरेखांची पारंपरिक चौकट मोडून त्यांना दिलेला आव्हानात्मक बाज, शिकागो विद्यापीठात केलेले अध्यापन तसेच पद्मभूषण, पद्मश्री, ज्ञानपीठासह अनेक पुरस्कारांचे मानकरी... अशा समृद्ध कारकिर्दीचे धनी असलेले ज्येष्ठ नाटककार, कलावंत, दिग्दर्शक गिरीश कर्नाड यांच्या निधनाने अवघे कला क्षेत्र शोकमग्न झाले आहे. विदर्भ साहित्य संघाच्या नव्वदीनिमित्त २४ मार्च २०१४ रोजी साहित्य संघाच्या संकुलात आयोजित नवतीच्या पर्वात गिरीश कर्नाड यांची मुलाखत अजेय गंपावार यांनी घेतली होती. यात प्रायोगिक, व्यावसायिक तसेच जागतिक रंगभूमीचा परामर्श घेताना डॉ. कर्नाड यांनी अत्यंत स्पष्ट व परखडपणे आपली मते मांडली होती. त्याचा गोषवारा देत आहेत स्वत: मुलाखत घेणारे अजय गंपावार
भारतीय आधुनिक रंगभूमीला वेगळे वळण देणाऱ्या गिरीश कर्नाडांचा आदरयुक्त दरारा सर्वांच्या मनात आहे. फक्त नाटककार, दिग्दर्शक, अभिनेता एवढीच त्यांची प्रतिमा नाही तर तत्त्ववेत्ता, सामाजिक प्रश्नांवर सडेतोड ठाम भूमिका घेणारे चिंतनशील व्यक्ती या त्यांच्या भूमिकासुद्धा सर्वमान्य आहेत. त्यांच्या राजकीय विचारांबाबत कुणाचे मतभेद असू शकतात; पण त्यांच्या कलाकृतींबाबत मात्र कुणाच्याही मनात किंतू येऊ शकत नाही. पद्मश्री, पद्मभूषण, संगीत नाटक अकादमी, साहित्य अकादमी यासारख्या अनेक पुरस्कारांनी आणि ज्ञानपीठ सन्मानाने विभूषित गिरीश कर्नाड नागपूरला विदर्भ साहित्य संघात आले होते. तेव्हा त्यांचा प्रचंड साधेपणा नागपूरकरांनी अनुभवला. अहंकार, मोठेपणा अशी कोणतीही झूल न पांघरता प्रेक्षकांशी, रसिकांशी त्यांनी जो संवाद साधला तो अविस्मरणीय होता. व्यावसायिक चित्रपटांमधून केलेल्या भूमिकांमुळे सर्वसामान्यांना साहित्यातील, रंगभूमीवरील त्यांच्या उत्तुंग कामगिरीपेक्षा त्यांचे फिल्मी ग्लॅमरच अधिक माहीत आहे.
गिरीश कर्नाड यांच्या पोटातील अनेक रहस्ये आता या मुलाखतीदरम्यान उलगडल्या जातील, असा उल्लेख होताच त्यांनी पोट फुटल्याचा बेमालूम अभिनय केला आणि सारे सभागृह श्रोत्यांच्या हसण्याने दणाणून गेले. एका गंभीर प्रवृत्तीच्या लेखकाची ही मिश्किली साऱ्यांनाच मनापासून आवडली. मी मराठी उत्तम बोलतो, मी तुमच्याशी मराठीतच संवाद साधणार आहे, असे म्हणत त्यांनी साऱ्या सभागृहाला जिंकून घेतले. अतिशय निर्भीड आणि स्पष्ट भाष्य करणारे त्यांचे आत्मचरित्र हेमा मालिनीसोबत होणाऱ्या पण न झालेल्या लग्नाच्या दिलखुलास किस्स्यावर संपते, याची आठवण आवर्जून व्हावी, असेच हे क्षण होते.
त्यांनी दिग्दर्शित केलेल्या उत्सव या चित्रपटात शशी कपूर यांनी साकारलेला खलनायक मुळात अमिताभ बच्चन करणार होते. अपघातामुळे पुढे ही भूमिका अमिताभ साकारू शकले नाही. त्या काळातील तो एक मोठा एक्सपरीमेंट होता. दुर्दैवाने ते घडू शकले नाही, अशी एक वेगळीच आठवण यानिमित्ताने श्रोत्यांना ऐकायला मिळाली. संस्कार हा त्यांनी दिग्दर्शित केलेला पहिलाच चित्रपट सेन्सॉरने बॅन केला होता. पुढे याच चित्रपटाला राष्ट्रपतींचं सुवर्णकमळ मिळालं होतं, असे म्हणत त्यांनी सेन्सॉरचा मला प्रचंड अनुभव आहे, हेही सांगितले होते.
महेश एलकुंचवारांसोबतचे असलेले भावबंध व्यक्त करत त्यांनी नागपूरकरांना सुखावून टाकले होते. ते म्हणाले, महेश एलकुंचवारांचे वासांसी जीर्णानी याचा अनुवाद मी केला होता. एलकुंचवार यांच्या नाटकात कमी शब्दात मोठा आशय आहे. हा पॉझ मला इतरत्र सापडला नाही. त्यामुळेच मी एलकुंचवारांच्या प्रेमात आहे.
कर्नाड म्हणाले होते, मला मुळात कवी व्हायचे होते. इंग्लंडला जाऊन इंग्रजी कवितांसाठी नोबेल मिळवावे अशी माझी इच्छा होती. पण मी नाटककार झालो. कन्नड भाषेमुळे मी नाटकांकडे वळलो. पहिले नाटक ययाती सहजपणे आले. पण नंतर तुघलकपासून मी बराच अभ्यास सुरू केला. नाटक हे घर बांधण्यासारखे किंवा अपत्य जन्माला घालण्यासारखे असते. नाटक हे क्रिएशन आहे. त्यात इतिहासाचे वेगवेगळे पैलू शोधण्याचा प्रयत्न असतो. सिनेमाला सेन्सॉरशिप असावी, पण ती कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातूनच. कलाकृतीला धक्का पोहोचविणारे नियंत्रण मला मान्यच नाही.
प्रचंड विद्वत्ता, व्यासंग, उत्तुंग कामगिरी, तेंडुलकरांसोबतचे मतभेद, बादल सरकार, मोहन राकेश, सत्यदेव दुबे यांच्या आठवणी, नव्या पिढीतल्या कलाकारांना मनापासून दिलेली दाद यामुळे चकित झालेल्या नागपूरकर श्रोत्यांना आपल्या संमोहनात कायम ठेवत गिरीश कर्नाडांनी आज एक्झिट घेतली.
- अजेय गंपावार