छत्तीसगडमधील युवती निघाली कर्नाटकमधील मित्राकडे

By नरेश डोंगरे | Published: November 17, 2024 08:52 PM2024-11-17T20:52:50+5:302024-11-17T20:53:28+5:30

नागपूर स्थानकावर झाली चलबिचल : पहाटे २ वाजता 'त्यांनी' तिला नेले ...

girl from chhattisgarh found in friend in karnataka | छत्तीसगडमधील युवती निघाली कर्नाटकमधील मित्राकडे

छत्तीसगडमधील युवती निघाली कर्नाटकमधील मित्राकडे

नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : जगरहाटीची फारशी माहिती नसलेली छत्तीसगडमधील एक युवती थेट कर्नाटकमधील आपल्या मित्राला भेटायला निघाली. मात्र, नागपूरला रेल्वे स्थानकावर आल्यानंतर ती अस्वस्थ झाली. पहाटे २ च्या सुमारास तिच्यावर एका व्यक्तीची नजर पडली. ती एकटीच आहे, असहाय आहे, हे त्या व्यक्तीने हेरले अन् नंतर असा काही घटनाक्रम घडला की तिचे आयुष्य अंधाराच्या गर्तेत जाण्यापासून वाचले. 

युवती रायपूर, छत्तीसगड येथील आहे. शुक्रवारी दुपारी ती ट्युशन क्लासला जातो म्हणून घराबाहेर पडली. ईकडे रात्र झाली तरी ती परतली नाही. मोबाईलही बंद होता. त्यामुळे काळजीत पडलेल्या पालकांनी तिची शोधाशोध सुरू केली. ट्यूशन क्लास, मित्र-मैत्रिणी, नातेवाईक साऱ्यांकडेच विचारपूस केली. मात्र, कुणाकडूनच काही कळेना. त्यामुळे चिंताग्रस्त झालेल्या पालकांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. त्यानंतर अख्खी रात्र शोधाशोध झाली, दिवसही उजाडला. मात्र बेपत्ता युवतीबद्दल कुठलीच माहिती मिळाली नसल्याने पोलीसही हादरले. काय करावे, कुठे शोधावे, असा प्रश्न पडला असतानाच पालकांचा मोबाइल फॅन खणखणला. धडधडत्या छातीने फोन उचलून 'हेलो' म्हणताच फोनधारकाला बेपत्ता युवतीबद्दलची माहिती मिळाली. ती ऐकून क्षणाचाही विलंब न करता ही मंडळी रायपूर (छत्तीसगड) मधून नागपूरकडे निघाली. येथे थेट रेल्वे सुरक्षा दलाचे ठाणे त्यांनी गाठले. समोर बेपत्ता मुलगी होती. तिला पाहून पालकांनी लगेच चाैकशी सुरू केली.   

ही युवती रायपूरहून नागपुरात कशी काय पोहचली, तिला हा प्रवास करण्यास कुणी बाध्य केले, तिला आरपीएफने कसे ताब्यात घेतले, आदी प्रश्न अनुत्तरीत होते. त्याचा खुलासा नंतर करण्यात आला. त्यानुसार, या युवतीची बेंगलुरूच्या एका युवकासोबत मैत्री होती. ते सलग संपर्कात राहत होते. त्यातुनच तिने कुटुंबियांना कसलीही माहिती न देता ट्युशनला जातो असे सांगून थेट रेल्वे स्थानक गाठले आणि सिकंदराबाद सुपरफास्ट एक्सप्रेसमध्ये बसून नागपूरला पोहचली. येथे पहाटे २ च्या सुमारास तिच्यावर एका व्यक्तीची नजर गेली. तिची चलबिचल अवस्था पाहून त्यांना संशय आला. तिची विचारपूस केल्यानंतर तिचे भवितव्य धोक्यात असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी तिला आरपीएफ ठाण्यात आणले. आरपीएफच्या महिला उपनिरीक्षक पूजा सूर्यवंशी यांनी तिला विश्वासात घेतले अन् तिने बेंगळुरूला मित्राकडे निघाल्याची माहिती सांगितली. त्यानंतर तिचे समुपदेशन करून तिच्या कुटुंबियांना बोलविण्यात आले आणि कायदेशिर प्रक्रिया आटोपल्यानंतर युवतीला पालकांच्या हवाली करण्यात आले.

Web Title: girl from chhattisgarh found in friend in karnataka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.