फेसबुक फ्रेंडच्या प्रेमाखातर तिने सोडले घर.. नागपुरात आढळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2021 02:49 PM2021-12-09T14:49:28+5:302021-12-09T15:23:58+5:30
फेसबुकरून प्रेमात पडलेल्या एका तरुणीने मित्राला भेटायला राजस्थानला जाण्याचे ठरवले. तिने बॅग भरली व थेट नागपूर गाठले. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे तरुणीला ताब्यात घेतल्याने मोठा अनर्थ टळला.
नागपूर : फेसबुकवर तरुणाच्या प्रेमात पडून त्याला भेटायला राजस्थानला निघालेल्या एका तरुणीला सीताबर्डी पोलिसांच्या सतर्कतेने चुकीच्या हातात जाण्यापासून वाचविले. पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन सुखरुप तिच्या आईवडिलांच्या स्वाधिन केले.
हिंगोली जिल्ह्यातील १८ वर्षीय तरुणीची फेसबुकवर राजस्थानात राहणाऱ्या तरुणाशी ओळख झाली. काही दिवस चॅटिंग केली नंतर दोघेही प्रेमात पडले. दररोज एकमेकांशी मोबाइलवर बोलणे सुरू झाले. त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवून राजस्थानला येण्यास सांगितले. व सोबत येताना काही पैसेही घेऊन येण्यास सांगितले. पैसे असल्यास लग्न करून नव्याने संसार थाटू, अशी स्वप्ने त्याने दाखविली.
ही बया त्या प्रेमाला बळी पडली व मागचापुढचा विचार न तिने घर सोडण्याचा निर्णय घेतला. ४ डिसेंबरला तिने हिंगोलीतून पळ काढला. घरून निघताना तिने विडलांना सोयाबीन विकून मिळालेले ५२ हजार रुपये व दोन मोबाइल घेतले. ती दोन दिवस शाळेतील मैत्रिणीकडे राहिली व ७ डिसेंबरला नागपूरला पोहोचली. येथून ती राजस्थानला जाणार होती.
ऑटोचालकांना दिसली भांबावलेली
जवळपास दोन दिवस शहरात इकडे-तिकडे भटकल्यानंतर ती मुंजे चौकात भांबावलेल्या अवस्थेत बसलेली काही ऑटोचालकांना दिसली. त्यांनी याबाबत सीताबर्डी पोलिसांना सूचना दिली. पोलिसांनी तिला ताब्यात घेतले व विश्वासात घेऊन तिची विचारपूस केली. सुरुवातीला तिने बोलणे टाळले नंतर, तिने फेसबुक मित्राला भेटण्यासाठी घरातून पळ काढल्याचे सांगितले.
सोयाबीनचे ५२ हजार घेतले ताब्यात
तरुणीचे आईवडील शेतकरी असून शेतमजुरी करतात. तिच्या वडिलांनी नुकतीच शेतात पिकवलेल्या सोयाबीनची विक्री केली होती. या विक्रीतून त्यांना ५२ हजार रुपये मिळाले होते. हेच पैसे तरुणीने संधी साधून घेतले आणि नागपूरमार्गे राजस्थानकडे निघाली होती. मात्र, सीताबर्डी पोलिसांनी मुंजे चौकातून तिला ताब्यात घेतले व तिच्या आईवडिलांना बोलावून त्यांच्या स्वाधिन केले. पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. तरुणीच्या आईवडिलांनी पोलिसांचे आभार मानले.