तरुणीवर बलात्कार करून खून, आरोपीस जन्मठेप
By Admin | Published: December 31, 2015 03:07 AM2015-12-31T03:07:22+5:302015-12-31T03:07:22+5:30
काटोल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चारगाव येथील एका तरुणीवर बलात्कार करून जाळून खून केल्याप्रकरणी ...
न्यायालय : काटोल भागात घडला होता थरार
नागपूर : काटोल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चारगाव येथील एका तरुणीवर बलात्कार करून जाळून खून केल्याप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. एस. तरारे यांच्या न्यायालयाने आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
जितेंद्र नरेश माटे (२६) असे आरोपीचे नाव असून, तो चारगाव येथीलच रहिवासी आहे. प्रिया ऊर्फ प्रणिता मारोती लोखंडे (२०), असे मृत तरुणीचे नाव होते. या खटल्याची पार्श्वभूमी अशी, १३ डिसेंबर २०१३ ला ही तरुणी आपल्या घरात एकटीच असताना जितेंद्रने घरात घुसून तिच्यावर बलात्कार केला होता. त्यानंतर लग्नाच्या मुद्यावर दोघांमध्ये भांडण होऊन जितेंद्र याने तिच्या अंगावर रॉकेल ओतून तिला जाळले होते.
मेयो इस्पितळात ४ जानेवारी २०१४ रोजी प्रियाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. काटोल पोलिसांनी भादंविच्या ४५२, ३७६ (२) (एम), ४५०, ३०२ कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली होती. उपनिरीक्षक सुनीता पवार यांनी तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात खटला चालून एकूण १३ साक्षीदार तपासण्यात आले.
अशी आहे शिक्षा
नागपूर: आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध होऊन भादंविच्या ३०२ कलमांतर्गत जन्मठेप, तीन हजार रुपये दंड, ४५२ कलमांतर्गत पाच वर्षे सश्रम कारावास, एक हजार रुपये दंड आणि ३७६ कलमांतर्गत सात वर्षे सश्रम कारावास आणि दोन हजार रुपये दंड, अशी शिक्षा सुनावण्यात आली.
न्यायालयात सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील कल्पना पांडे यांनी काम पाहिले.(प्रतिनिधी)