‘आयआयएम-नागपूर’मध्ये विद्यार्थिनींचा टक्का घटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2019 11:26 AM2019-11-25T11:26:10+5:302019-11-25T11:27:58+5:30
महाराष्ट्रातील पहिले ‘आयआयएम’ (इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट) असलेल्या ‘आयआयएम-नागपूर’कडे मागील वर्षीच्या तुलनेत २०१९-२१ च्या ‘बॅच’मध्ये विद्यार्थिनींच्या प्रवेशाचा टक्का घटला आहे.
योगेश पांडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्रातील पहिले ‘आयआयएम’ (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट) असलेल्या ‘आयआयएम-नागपूर’कडे मागील वर्षीच्या तुलनेत २०१९-२१ च्या ‘बॅच’मध्ये विद्यार्थिनींच्या प्रवेशाचा टक्का घटला आहे. यंदा ६ टक्क्यांची घट दिसून आली आहे. मागील ‘बॅच’मध्ये प्रथमच विद्यार्थिनींची संख्या २० टक्क्यांहून अधिक गेली होती. दुसरीकडे यंदा प्रवेशित विद्यार्थ्यांमध्ये ‘फ्रेशर्स’ची संख्या काही प्रमाणात वाढलेली आहे.
‘आयआयएम-नागपूर’ स्थापन झाल्यानंतर पहिले तीन वर्षे विद्यार्थिनींचा ओढा कमीच असल्याचे दिसून आले होते. २०१८-२० च्या या चौथ्या ‘बॅच’मध्ये विद्यार्थिनींची संख्या २२ टक्के इतकी गेली होती. परंतु या वर्षी ‘आयआयएम-नागपूर’मध्ये १२३ प्रवेश असून यातील विद्यार्थिनींची संख्या ही जवळपास १६ टक्के इतकीच आहे. मागील वर्षीच्या तुलनेत सहा टक्क्यांची घट झाली आहे.
‘आयआयएम-अहमदाबाद’सह विविध ‘आयआयएम’मध्ये काही वर्षांपूर्वी विद्यार्थिनींची संख्या फारच कमी होती. मात्र ही टक्केवारी वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले.
‘आयआयएम-नागपूर’मध्ये मागील वर्षीपासून याबाबत पुढाकार घेण्यात आला. मात्र ही संख्या आणखी वाढविण्याची आवश्यकता असल्याचे मत शिक्षणक्षेत्रातून व्यक्त होत आहे.
विद्यार्थ्यांना उद्योगक्षेत्राचा २९ महिन्यांचा सरासरी अनुभव
‘आयआयएम-नागपूर’च्या या ‘बॅच’मधील बहुतांश विद्यार्थी कुठे ना कुठे कार्यरत राहून चुकले आहे. यंदाच्या ‘बॅच’मधील ‘फ्रेशर्स’ विद्यार्थ्यांची टक्केवारी १३ टक्के इतकी आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा २ टक्क्यांची वाढ झाली आहे. ५९ टक्के विद्यार्थ्यांना ३ वर्षांपर्यंतच्या कामाचा अनुभव आहे. तर २८ टक्के विद्यार्थ्यांना तीन वर्षांहून अधिक कामाचा प्रत्यक्ष अनुभव आहे. या ‘बॅच’मधील विद्यार्थ्यांचा उद्योगक्षेत्रात कामाचा सरासरी अनुभव हा २९ महिने इतका आहे. तर विद्यार्थ्यांचे सरासरी वय हे २५ वर्षे इतके आहे.