‘यू-ट्यूब’वर व्हिडीओ पाहून मुलीने घेतला गळफास, नागपुरातील हृदयदावक घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2019 04:16 AM2019-07-01T04:16:46+5:302019-07-01T04:17:22+5:30
यू-ट्यूबवर दोन मुली गळपास घेत असल्याचा व्हिडीओ तिने पाहिला. यापूर्वीही तिने हा व्हिडीओ अनेकदा पाहिला होता.
नागपूर : लहान मुलांसाठी स्मार्टफोन आता जीवघेणा ठरू लागला आहे. हंसापुरी भागातील १२ वर्षांच्या मुलीने यू-ट्यूबवर गळफास घेण्याचा व्हिडीओ पाहून स्वत: पट्ट्याने गळफास घेतला, त्यात तिचा मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना शनिवारी सायंकाळी ४ वाजता घडली.
शिखा विनोद राठोड ही सहावीत शिकत होती. शनिवारी शाळेतून आल्यावर ती लहान बहिणीसोबत मोबाईलवर खेळू लागली. यानंतर यू-ट्यूबवर दोन मुली गळपास घेत असल्याचा व्हिडीओ तिने पाहिला. यापूर्वीही तिने हा व्हिडीओ अनेकदा पाहिला होता. त्यामुळे कुटुंबीयांनी तिच्या या कृत्याला फारसे गांभीर्याने घेतले नाही. तिने आपल्या आईलाही या व्हिडीओबाबत सांगितले होते. आईने तेव्हा तिला असे व्हिडीओ न पाहण्याबाबत ताकीद दिली होती.
सायंकाळी शिखा आपल्या खोलीत लहान बहिणीसोबत पुन्हा तो व्हिडीओ पाहत होती. शिखाने व्हिडीओ पाहून आपला पट्टा पंख्याला बांधला. ती व्हिडीओत दाखविल्याप्रमाणे करू लागली. ती ज्या स्टुलवर उभी होती, तो खाली पडला आणि पट्ट्याचा तिच्या गळ््याला फास बसला. ती ओरडू लागली. लहान बहिणीने स्वयंपाकघरात असलेल्या आईला बोलावून आणले. आईने बेशुद्धावस्थेतील शिखाला खाली उतरवले. तिला रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले.
मुलांमध्ये मोबाईलची सवय धोकादायक
मानसोपचार तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, मोबाईलवर व्हिडिओ पाहण्याचे व्यसन मुलांसाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे पालकांना त्यांची मुले मोबाईलवर काय पाहत आहेत, याकडे लक्ष ठेवण्याची गरज आहे.