काटोल रेल्वेस्थानकावरून अपहरण केलेली विद्यार्थिनी सुखरुप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 10:52 PM2018-12-08T22:52:13+5:302018-12-08T22:55:29+5:30
काटोल रेल्वेस्थानकावरून अपहरण केलेली दहाव्या वर्गातील विद्यार्थिनी सुखरुप असून अपहरण करणाऱ्या आरोपीला लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने त्यास १० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : काटोल रेल्वेस्थानकावरूनअपहरण केलेली दहाव्या वर्गातील विद्यार्थिनी सुखरुप असून अपहरण करणाऱ्या आरोपीला लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने त्यास १० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.
मुकेश भोसले (२९) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. मुकेशला पत्नी आणि तीन मुले आहेत. तीन वर्षापूर्वी विद्यार्थिनीची मुकेशसोबत ओळख झाली. हळूहळू त्यांची मैत्री वाढत गेली. ती अल्पवयीन असल्याचा गैरफायदा घेत त्याने तिला आपल्या जाळ्यात ओढले. २३ आॅक्टोबरला सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास विद्यार्थिनी आपल्या भाऊजीसोबत काटोल रेल्वेस्थानकावर आली. त्यांना मध्य प्रदेशातील मोठ्या बहिणीकडे जायचे होते. गाडीची प्रतीक्षा करीत असताना लघुशंकेला जात असल्याचे भाऊजीला सांगून विद्यार्थिनी गेली. बराच वेळ होऊनही ती परतली नाही. तिच्या भाऊजीने या घटनेची माहिती तिच्या कुटुंबीयांना दिली. दरम्यान, आई-वडिलांनी लोहमार्ग पोलिसात मुकेशविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदविला. लोहमार्ग पोलिसांनी मुकेशला मोबाईलवर फोन करून ठाण्यात बोलाविले. मात्र, तो येत नसल्यामुळे सायबर सेलच्या मदतीने त्याच्या मोबाईल क्रमांक ट्रेस केला. तो अमरावती जिल्ह्यातील गौरखेडा, पारधीबेडा (चांदूर रेल्वे) येथे असल्याचे समजताच त्यास अटक करण्यात आली. ही कारवाई उपनिरीक्षक संदीप जाधव, उपनिरीक्षक रोशन खांडेकर, रवींद्र सावजी, आशिष श्रीखंडे, गीता नागदिवे आणि अनुज पांडे यांनी केली.