तरुणीकडून मैत्रिणीवर ‘गँग’सह हल्ला; दहाहून अधिक आरोपींवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2023 10:31 AM2023-02-22T10:31:21+5:302023-02-22T10:33:07+5:30

व्हिडीओ व्हायरल केल्याचा संशय; पाचपावलीतील घटना

Girl with gang assaults her friend in nagpur; case registered against more than ten accused | तरुणीकडून मैत्रिणीवर ‘गँग’सह हल्ला; दहाहून अधिक आरोपींवर गुन्हा दाखल

तरुणीकडून मैत्रिणीवर ‘गँग’सह हल्ला; दहाहून अधिक आरोपींवर गुन्हा दाखल

googlenewsNext

नागपूर : व्हिडीओ व्हायरल केल्याच्या संशयातून एका तरुणीने तिच्या मित्रांच्या मदतीने जुन्या मैत्रिणीवर हल्ला करून जखमी केले. यात मैत्रिणीची आजीदेखील जखमी झाली आहे. सोबतच हल्लेखोरांनी दगडफेक करून घराचेदेखील नुकसान केले. सोमवारी रात्री पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बाळाभाऊ पेठ येथे ही घटना घडली. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

१९ वर्षीय सलोनी, तिचा साथीदार सलमान उर्फ सॅम शेख, मारुत खान, रेहान, शशांक धारगावे, इब्राहिम शेख उर्फ सरकार, शरयू खोब्रागडे, यश आणि इतर दोन-तीन तरुणांचा आरोपींमध्ये समावेश आहे. सलोनीची सिद्धी नावाच्या मुलीशी जुनी मैत्री आहे. सिद्धीने तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा सलोनीला संशय होता व त्यातूनच काही दिवसांपासून दोघांमध्ये खडाजंगी झाली होती.

सोमवारी सिद्धी तिची आजी सुलोचना (७५) आणि कुटुंबातील इतर सदस्यांसह घरी बसली होती. त्याचवेळी सलोनी तिच्या मित्रांसोबत सिद्धीच्या घरी आली. सलोनीने तेथे येऊन वाद घालण्यास सुरुवात केली व यानंतर व्हिडीओ व्हायरल करण्याच्या स्थितीतच राहणार नाही, असे म्हणत हल्ला केला. इतर आरोपींनी घराचा दरवाजा वीट मारून तोडला. सिद्धीवर हल्ला होत असल्याचे पाहून तिची आजी सुलोचना यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी सुलोचना यांच्यावर विटेने वार करून जखमी केले. तोडफोड केल्यानंतर आरोपी पळून गेले. घटनेची माहिती मिळताच पाचपावली पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. सिद्धीची आजी सुलोचना यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Girl with gang assaults her friend in nagpur; case registered against more than ten accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.