‘सीए’मध्ये मुलींचाच दबदबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 10:56 AM2019-01-24T10:56:46+5:302019-01-24T10:58:50+5:30
‘आयसीएआय’तर्फे (द इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाऊंटंट आॅफ इंडिया) ‘सीए’ अंतिम वर्षांच्या नवीन व जुना अभ्यासक्रम, ‘फाऊंडेशन’ परीक्षा व ‘सीपीटी’चा (कॉमन प्रोफिशिएन्सी टेस्ट) निकाल जाहीर करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘आयसीएआय’तर्फे (द इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाऊंटंट आॅफ इंडिया) ‘सीए’ अंतिम वर्षांच्या नवीन व जुना अभ्यासक्रम, ‘फाऊंडेशन’ परीक्षा व ‘सीपीटी’चा (कॉमन प्रोफिशिएन्सी टेस्ट) निकाल जाहीर करण्यात आला. यंदाच्या निकालांमध्ये विद्यार्थिनींचाच दबदबा राहिला आहे. ‘टॉपर्स’मध्येदेखील विद्यार्थिनींचाच जास्त प्रमाणात समावेश आहे.
नोव्हेंबर २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या ‘सीए’ अंतिम वर्ष (नवीन अभ्यासक्रम) परीक्षेत नागपूरच्या प्रियांशी जैन व दिशा बतरा (जुना अभ्यासक्रम) यांनी अखिल भारतीय पातळीवर १५ वा क्रमांक पटकावला. या दोघी नागपुरात त्यांच्या अभ्यासक्रमात ‘टॉपर्स’ असण्याची शक्यता आहे. चिराग बतरा (नवीन अभ्यासक्रम) याने अखिल भारतीय पातळीवर १७ वा क्रमांक प्राप्त केला.
चिराग नागपुरातून दुसऱ्या स्थानावर असण्याची शक्यता आहे. अखिल भारतीय पातळीवर ४९ वा क्रमांक प्राप्त करणारा राहुल आहुजा हा शहरातूनच तिसऱ्या स्थानावर असू शकतो. अनेक विद्यार्थ्यांनी रात्री उशिरापर्यंत निकाल
पाहिले नव्हते.
‘आयसीएआय’च्या नागपूर शाखेचे अध्यक्ष उमंग अग्रवाल यांच्यानुसार या परीक्षांत मागील वर्षीच्या तुलनेत चांगले निकाल आले आहे. विद्यार्थ्यांनी चांगली कामगिरी केली आहे. निकाल उशिरा घोषित झाल्यामुळे नागपुरातील नेमके किती विद्यार्थी यशस्वी झाले, हे कळू शकलेले नाही. ‘सीए’ परीक्षांच्या तयारीशी जुळलेले तज्ज्ञ रुपेश जारोदे यांनी निकाल उत्साहित करणारे असल्याचे सांगितले.
‘फाऊंडेशन’मध्ये वैष्णवी तिवारी देशात ३३ व्या स्थानी
प्राप्त माहितीनुसार नोव्हेंबर २०१८ मध्ये झालेल्या ‘सीए फाऊंडेशन’च्या परीक्षेत वैष्णवी तिवारी हिने अखिल भारतीय पातळीवर ३३ वा क्रमांक मिळविला आहे. ती नागपुरातून अव्वल असण्याची शक्यता आहे. देशभरात ४२ वा क्रमांक मिळविणारा आकाश साहू शहरातून दुसऱ्या स्थानी असू शकतो. करण बजाज याचा अखिल भारतीय पातळीवर ४७ वा क्रमांक आला. याशिवाय आदर्श अग्रवाल, सम्यक मोदी, यश दलाल, राजवीरसिंह भाटिया, अमन अग्रवाल, संस्कर अग्रवाल, कौशल टिबरेवाल यांनीदेखील ‘सीए फाऊंडेशन’च्या परीक्षेत उत्तम गुण मिळवत यश प्राप्त केले. वृत्त लिहिपर्यंत ‘सीपीटी’मध्ये श्रेय चांडक याने पहिले स्थान पटकाविल्याची माहिती मिळाली तर आतिशय बाकलिवाल दुसऱ्या क्रमांकावर असण्याची शक्यता आहे.