जुळ्या भावंडांनी वाचविला मुलीचा जीव
By admin | Published: November 27, 2014 12:22 AM2014-11-27T00:22:12+5:302014-11-27T00:22:12+5:30
संकटसमयी मदत न करता, पाठ दाखवून पुढे निघून जाणारी वृत्ती वाढली आहे. अपघातात बघ्याची भूमिका घेऊन गर्दी वाढविणारे खूप आहेत. माणुसकीची भावना हरविलेल्या लोकांच्या डोळ्यात
१० वर्षीय बालकांचा पराक्रम : कौतुकाची थाप
नागपूर : संकटसमयी मदत न करता, पाठ दाखवून पुढे निघून जाणारी वृत्ती वाढली आहे. अपघातात बघ्याची भूमिका घेऊन गर्दी वाढविणारे खूप आहेत. माणुसकीची भावना हरविलेल्या लोकांच्या डोळ्यात १० वर्षीय जुळ्या भावंडांनी अंजन घातले आहे. एका रिसोर्टच्या स्वीमिंग टँकमध्ये बुडत असलेल्या मुलीचा जीव वाचवून आपल्या साहसीवृत्तीची छाप सोडली आहे.
लक्ष्मीनगरात राहणारे गिरीश कठाळे यांची मुले ओम आणि सोहम आईसोबत एका रिसॉर्टमध्ये सहलीला गेले होते. येथील स्वीमिंग टॅँकमध्ये एका मुलीने उडी घेतली. तिला पोहता येत नसल्याने पाण्यात बुडायला लागली, आरडाओरड सुरू झाली. आजूबाजूचे सर्व टँकच्या सभोवताल गोळा झाले. मात्र तिला वाचविण्याचे साहस कुणीच दाखविले नाही. ओमच्या हे लक्षात आले. त्याने लगेच पाण्यात उडी घेतली. लागलीच सोहमही पोहत पोहत तिच्याजवळ पोहोचला. दोघांनीही तिचे हात पकडून तिला बाहेर काढले. ती घाबरलेली होती, तिच्यावर प्रथमोपचार केल्यावर ती बरी झाली. उपस्थित सर्वांनी ओम-सोहमच्या धैर्याचे कौतुक केले. तिच्या पालकांचे तर आनंदाश्रू थांबत नव्हते. देवदूत म्हणून येऊन या दोघांनी माझ्या मुलीला पुनर्जन्मच दिला, अशा भावना त्यांनी ओम-सोहमच्या पालकांकडे व्यक्त केल्या.
ओम आणि सोहम हे दोघेही बी.आर. मुंडले शाळेत ५ व्या वर्गात शिकत आहेत. वयाच्या चौथ्या वर्षापासून ते पोहण्याचा सराव करीत आहेत. दोघेही उत्तम पोहतात. त्यांच्या पराक्रमाची वार्ता शाळेत, परिसरात, शहरातही पसरल्याने सर्वांकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.(प्रतिनिधी)
आयुष्यभर खंत असती
तुम्ही एवढे साहस कसे काय दाखविले असे दोघांनाही विचारले असता ते म्हणाले, आम्हाला पोहता येते. आम्ही तिला वाचवू शकलो नसतो, तर आमच्या पोहण्याला काहीच अर्थ नसता. आयुष्यभर मनात खंतही असती. तिला वाचवायचे आहे, एवढेच मनात होते. त्यात आम्ही यशस्वी झालो, अशा भावना दोघांनीही व्यक्त केल्या.
महापौरांकडून कौतुकाची थाप
महापौरांना जेव्हा या दोन्ही बालकांच्या पराक्रमाची वार्ता कळली, तेव्हा महापौर प्रवीण दटके यांनी घरी जाऊन दोघांचाही सत्कार केला. त्यांच्या उज्ज्वल भविष्याबद्दल शुभेच्छा दिल्या. यावेळी लक्ष्मीनगर झोनचे सभापती गोपाल बोहरे, सहा. आयुक्त राठोड, झोनचे सर्व अधिकारी उपस्थित होते.