मुलींनी आत्मविश्वासाने सक्षम व्हावे : महापौर नंदा जिचकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2019 11:57 PM2019-01-03T23:57:26+5:302019-01-03T23:58:13+5:30
आज प्रत्येक क्षेत्रात मुली आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवित आहेत. याचे सारे श्रेय केवळ क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनाच जाते. मुलींसाठी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवून त्यांना झेप घेण्यासाठी सावित्रीबाईंनी आकाश मोकळे करून दिले. मुलींनी आत्मविश्वासाने प्रत्येक प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी आत्मविश्वासाने सक्षम व्हावे, असे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आज प्रत्येक क्षेत्रात मुली आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवित आहेत. याचे सारे श्रेय केवळ क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनाच जाते. मुलींसाठी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवून त्यांना झेप घेण्यासाठी सावित्रीबाईंनी आकाश मोकळे करून दिले. मुलींनी आत्मविश्वासाने प्रत्येक प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी आत्मविश्वासाने सक्षम व्हावे, असे आवाहन महापौरनंदा जिचकार यांनी केले.
महापालिकेच्या महिला व बाल कल्याण विशेष समितीच्यावतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त गुरुवारी रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये सुप्रसिद्ध कवयित्री विजया मारोतकर यांच्या ‘पोरी जरा जपून’ या काव्यमय प्रबोधनात्मक कार्यक्रमाच्या २०० व्या प्रयोगाचे विद्यार्थिनीसाठी आयोजन करण्यात आले. यावेळी महापौर बोलत होत्या.
कार्यक्रमाला कवयित्री विजया मारोतकर,महिला व बालकल्याण समिती सभापती प्रगती पाटील, झोन सभापती रूपाली ठाकूर, रिता मुळे, विशाखा मोहोड, जयश्री वाडीभस्मे, स्वाती आखतकर, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, डॉ. मीनाल मोकदम, सरिता मते, विजया ब्राह्मणकर, डॉ. पूजा धांडे, विजया भुसारी, मंजू कारेमोरे, अश्विनी बावनकर आदी उपस्थित होते.
प्रारंभी महापौर व सर्व मान्यवरांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. महापौरांच्या हस्ते कवयित्री विजया मारोतकर यांचा सत्कार करण्यात आला. पोरी जरा जपून या सत्यकथन पुस्तकाचे नंदा जिचकार व मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. २५ जानेवारी ते १० फेब्रुवारीपर्यंत लोकशाही पंधरवडा साजरा करण्यात येत असून यानिमित्त १८ वर्षे पूर्ण झालेल्या मुले व मुलींनी मतदार म्हणून नोंदणी करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.
विजया मारोतकर यांनी उपस्थित शालेय व महाविद्यालयीन मुलींना बदलत्या काळात आधुनिकतेची शाल पांघरताना घ्यावयाची काळजी व संभाव्य धोक्याबाबत सूचक इशारा दिला. आधी आजी-आजोबा घरी मुलांचा सांभाळ करायचे, त्यांना संस्काराचे धडे द्यायचे. आज त्यांना घराची दारे बंद झाल्याने मुले पाळणाघर, शेजारी, कामवाली अशा ठिकाणी सांभाळली जातात. मात्र अशा ठिकाणांमधूनच ८० टक्के मुलींवर अत्याचार होत असल्याचे त्यांनी सांगितले.