नागपुरात पाण्याच्या बादलीत पडून चिमुकलीचा करुण अंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 10:47 PM2020-04-27T22:47:05+5:302020-04-27T22:56:46+5:30
खेळता खेळता पाण्याच्या बादलीत पडून एका दोन वर्षीय चिमुकलीचा करुण अंत झाला. वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : खेळता खेळता पाण्याच्या बादलीत पडून एका दोन वर्षीय चिमुकलीचा करुण अंत झाला. वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
अन्सारी फातिमा शेख हाफीज असे मृत चिमुकलीचे नाव आहे. वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रोशनबाग परिसरात तिचे घर आहे. आई-वडील आणि घरची मंडळी आज सकाळी इतरत्र कामात गुंतली होती, तर चिमुकली फातेमा घरात खेळत होती. बाजूलाच पाण्याने भरलेली बादली होती. खेळता खेळता तिचा तोल गेला आणि ती पाण्याच्या बादलीत पडली. बराच वेळ हा प्रकार लक्षात आला नाही. नंतर जेव्हा कुटुंबीयांच्या लक्षात हा प्रकार आला तेव्हा त्यांनी तिला तातडीने मेडिकलमध्ये नेले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.