गिरणार सोसायटीच्या कर्मचाऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2020 01:14 AM2020-10-03T01:14:21+5:302020-10-03T01:15:22+5:30
suicide case, Nagpur News गिरणार सोसायटीत काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने गळफास लावून आत्महत्या केली. पोटाच्या व्याधीला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज असून नंदनवन पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गिरणार सोसायटीत काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने गळफास लावून आत्महत्या केली. पोटाच्या व्याधीला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज असून नंदनवन पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहे.
रोशन पांडुरंगजी लाडेकर (वय ३१) असे मृताचे नाव आहे . तो नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जुना बगडगंज, कुंभार टोली परिसरात राहत होता. शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे रोशन तयार झाला. घरी नाश्ता केल्यानंतर त्याने ७ वाजता आपल्या बेडरूममध्ये जाऊन आराम करतो, असे घरच्यांना सांगितले. ९ वाजले तरी तो खाली उतरला नाही. त्यामुळे रोशनचा भाऊ राकेश त्याच्या रूममध्ये गेला. आतून दार लावून होते. राकेशने खिडकीतून बघितले असता रोशन गळफास लावून दिसला. त्याने आरडाओरड करून आजूबाजूची मंडळी गोळा केली. त्यानंतर आ. खोपडे यांना माहिती दिली. खोपडे यांची ही पतसंस्था आहे. रोशन हा माजी नगरसेवक अनिल धावडे यांचा भाचा आहे. त्यामुळे धावडे समर्थकही मोठ्या संख्येत रोशनच्या घरी धावले. माहिती कळताच नंदनवन पोलीस तेथे पोहोचले. त्यांनी रोशनचा मृतदेह मेडिकलमध्ये नेला. या संबंधाने सर्वत्र उलटसुलट चर्चेला उधाण आले होते. रोशनला अनेक दिवसांपासून पोटदुखीचा प्रचंड त्रास होता. दोन दिवसापूर्वीच रहाटे हॉस्पिटलमधून तो उपचार घेऊन परतला होता. या संबंधाने आमदार खोपडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी रोशन आपल्या गिरणार सोसायटीत चतुर्थ श्रेणी कर्मचारी असल्याचे सांगून पोटदुखीच्या व्याधीमुळे त्याने आत्महत्या केली असावी, असा घरच्यांचा अंदाज असल्याचे सांगितले.
दोन वर्षांपूर्वीच झाले लग्न
रोशनचे दोन वर्षापूर्वीच लग्न झाले असून त्याला एक छोटी मुलगी असल्याचे समजते. या घटनेमुळे परिसरात वेगवेगळ्या प्रकारची चर्चा आहे.