अतिवृष्टीग्रस्तांना १०० कोटींचे पॅकेज द्या
By admin | Published: August 22, 2015 03:11 AM2015-08-22T03:11:32+5:302015-08-22T03:11:32+5:30
नागपुरात नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाने नदीकाठावरील झोपडपट्टीवासीयांचे प्रचंड नुकसान झाले.
राष्ट्रवादीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा : पूर्व नागपूरचे हजारो पीडित सहभागी
नागपूर : नागपुरात नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाने नदीकाठावरील झोपडपट्टीवासीयांचे प्रचंड नुकसान झाले. पूर्व नागपुरातील नागनदीकाठावरील सर्वच वस्त्या जलमय झाल्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. या पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १०० कोटींचे मदत पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली. या मागणीसाठी पूर्व विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.पक्षाचे प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे यांच्या नेतृत्वात संविधान चौकातून हा मोर्चा काढण्यात आला होता. माजी आमदार दीनानाथ पडोळे, राजेश माकडे, ईश्वर बाळबुधे, सुधा जैन, महेंद्र भांगे, नरेंद्र जैन, विंकी वर्मा, दिनकर वानखेडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. पूर्व विभागातील शास्त्रीनगर, हिवरीनगर, पडोळेनगर, पँथरनगर, कुंभारटोली, नंदनवन, भरतवाडा इत्यादी वस्त्यांना नागनदीला आलेल्या पुराचा फटका बसला होता. काहींची घरे पडली, तर काहींच्या घराच्या भिंतींना तडे गेले.
राकाँ कार्यकर्त्यांनी वस्त्यांमधील हजारो लोकांचे रेशन कार्ड, आधार कार्ड, बँक पासबुक जोडून सर्व मदत अर्ज तहसिल कार्यालयात नेऊन दिले व चौकशी करून तात्काळ मदतीसाठी उपाययोजना करण्याची मागणी केली.
नागनदीचे खोलीकरण, मलनिस्सारण, रस्ते,पूल व संरक्षण भिंतीच्या बांधकामासाठी ५०० कोटी व नदी काठावरील नुकसानग्रस्त झोपडपट्टीवासीयांसाठी १०० कोटींचे विशेष पॅकेज मुख्यमंत्र्यांनी त्वरित जाहीर करावे, अशी मागणी अतुल लोंढे यांनी यावेळी केली. विजय रामटेके, डॉ. विशाल बनकर, आनंदी बावनकर, ढेलुराम सेलोटिया, राहुल कांबळे, विक्की कनोजे, रुद्र धाकडे, रवी यादव, अमन जैन, राजू पिल्लेवान, जगदीश मेश्राम, शंकर डाखोरे, मुन्नालाल हिंगणेकर, सतीश वर्मा, सुरेखा मेंढे, विजया मेश्राम, सुधा ठवरे आदी कार्यकर्त्यांनी मोर्चासाठी विशेष मेहनत घेतली.(प्रतिनिधी)