पाच हजार दे, नाहीतर सीसीटीव्हीसमोर मर्डर करतो; सराईत गुंडाची भर बाजारात व्यापाऱ्याला धमकी

By योगेश पांडे | Published: October 3, 2023 03:20 PM2023-10-03T15:20:26+5:302023-10-03T15:20:52+5:30

वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारांची दहशत

Give 5 thousand, otherwise murder in front of CCTV; The inn bully threatens the trader in Bhar market | पाच हजार दे, नाहीतर सीसीटीव्हीसमोर मर्डर करतो; सराईत गुंडाची भर बाजारात व्यापाऱ्याला धमकी

पाच हजार दे, नाहीतर सीसीटीव्हीसमोर मर्डर करतो; सराईत गुंडाची भर बाजारात व्यापाऱ्याला धमकी

googlenewsNext

नागपूर : पाच हजार रुपयांच्या खंडणीसाठी मागील दीड महिन्यापासून एका सराईत गुंडाकडून व्यापाऱ्याला त्रास देण्यात येत आहे. अगोदर रात्री घरात शिरून व त्यानंतर भर बाजारात गुंडाने साथीदारांसह व्यापाऱ्याला खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. जर पाच हजार दिले नाही तर सीसीटीव्हीसमोरच खून करेल, या शब्दांत त्याने धमकावले. वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे.

प्रदीप रंगारी (४९, राठी ले आऊट) हे कपडा व्यापारी आहेत. त्यांच्या घराजवळच शुभम चरणदास मेंढे (२६) हा गुंड राहतो व तो अगोदर तुरुंगातदेखील जाऊन आला आहे. त्याने ३१ जुलै रोजी रंगारी यांना फोन करून पाच हजारांची खंडणी मागितली. त्यानंतर त्याने फिल्मीस्टाईल डायलॉग मारत जे मला पैसे देत नाहीत, त्यांना मी दुसरा दिवस पाहू देत नाही. जोपर्यंत मी तीन-चार खून करत नाही तोपर्यंत मला कुणीच बदमाश म्हणणार नाही. तुझा सीसीटीव्हीसमोरच खून करेन, अशी त्याने धमकी दिली.

शुभमच्या दहशतीमुळे रंगारी यांनी पोलीस तक्रार करण्याचे टाळले. मात्र ११ ऑगस्ट रोजी रात्री शुभम त्याचे साथीदार शुभम कैलास ससाणे (२५, आठवा मैल) व इम्रान उर्फ मोंटू रेहमान शेख ( २५, गणेशनगर झोपडपट्टी) यांच्यासह रंगारी यांच्या घरात शिरला. त्याने रंगारी व त्यांच्या पत्नीला धमकी देत पैशांची मागणी केली. जर पोलिसांत तक्रार केली तर कुटुंबाचा खात्मा करेन अशी धमकी आरोपींनी दिली. त्यानंतर येताजाता आरोपी रंगारी यांना धमकी देऊ लागले.

दोन दिवसांअगोदर रंगारी सकाळी आठवा मैल आठवडी बाजार परिसरात गेले असता आरोपींनी त्यांना परत गाठले व पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. सततच्या धमक्यांना कंटाळून अखेर रंगारी यांनी वाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली व तिघांविरोधातही तक्रार दिली. पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा नोंदविला असून शुभम मेंढे व मोंटू यांना अटक करण्यात आली आहे.  वाडी परिसरात अनेक गुंड सक्रिय असून त्यांची दहशत आहे. मात्र पोलिसांकडून नाममात्र कारवाई होत असल्याने त्यांच्यावर कुणाचाही वचक नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये पोलिसांबाबत प्रचंड नाराजीचा सूर आहे.

Web Title: Give 5 thousand, otherwise murder in front of CCTV; The inn bully threatens the trader in Bhar market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.