खातेधारकाला ३.५ लाख द्या; नागपूरच्या बँक आॅफ इंडियाला दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 10:54 AM2018-01-08T10:54:41+5:302018-01-08T10:55:09+5:30
संगणकीय सुरक्षाविषयक बाबींमध्ये निष्काळजीपणा झाल्याचे पुराव्यांवरून आढळून आल्यामुळे माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिवांनी बँक आॅफ इंडियाला दणका दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : संगणकीय सुरक्षाविषयक बाबींमध्ये निष्काळजीपणा झाल्याचे पुराव्यांवरून आढळून आल्यामुळे माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिवांनी बँक आॅफ इंडियाला दणका दिला आहे. बँकेच्या चुकीमुळे आर्थिक नुकसान झालेल्या खातेधारकाला ३ लाख ५० हजार रुपये देण्यात यावे असा आदेश देण्यात आला आहे.
निर्मलकुमार आठवले असे ग्राहकाचे नाव आहे. ३ लाख ५० हजार रुपयांत आठवले यांच्या स्वत:च्या २ लाख ५० हजार रुपयांचा समावेश आहे. त्यांना तक्रारीच्या खर्चापोटी ८० हजार तर, मानसिक त्रासाकरिता २० हजार रुपये देण्यात आले आहेत. तक्रारीतील माहितीनुसार, १७ जानेवारी २०१५ रोजी आठवले यांनी स्वत:च्या व पत्नीच्या नावाने बँक आॅफ इंडियाच्या वैशालीनगर शाखेत संयुक्त बचत खाते उघडले होते. बँकेने त्या खात्यावर न मागता इंटरनेट बँकिंग सुविधा दिली होती. त्यापूर्वी त्यांनी ७ जानेवारी २०१५ रोजी कामठी शाखेत वैयक्तिक बचत खाते सुरू केले होते. ते खाते त्यांनी २१ एप्रिल २०१५ रोजी बंद केले होते. त्या खात्यावर आठवले यांच्या विनंतीवरून इंटरनेट बँकिंग सुविधा देण्यात आली होती. त्यानंतर २७ जून २०१५ रोजी आठवले यांना त्यांच्या वैशालीनगर शाखेतील संयुक्त बचत खात्यातून ३ लाख १०० रुपये कपात झाल्याचा मॅसेज आला. त्यामुळे त्यांनी २९ जून २०१५ रोजी बँकेत तक्रार दिली व ४ जुलै २०१५ रोजी पाचपावली पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदविला. दरम्यान, बँकेने १ जुलै रोजी आठवले यांच्या खात्यात ५० हजार १०० रुपये जमा केले.
परंतु, उर्वरित दोन लाख ५० हजार रुपये त्यांना मिळाले नव्हते. त्यामुळे त्यांनी माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिवांकडे तक्रार दाखल केली होती. आठवले यांच्यातर्फे अॅड. महेंद्र लिमये व राजेश टेकाळे तर, बँकेतर्फे अॅड. उमेश देशपांडे यांनी कामकाज पाहिले.