पुढील वर्षात प्रवेश द्या, परीक्षा नंतर घ्या; केंद्रपातळीहून ‘माफसू’ला सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 01:02 PM2020-06-19T13:02:54+5:302020-06-19T13:03:53+5:30
अखेर केंद्रीय मत्स्यपालन, पशुपालन व डेअरी मंत्रालयाकडून सूचना जारी करण्यात आल्या आहेत. पहिल्या तीन वर्षांच्या विद्यार्थ्यांचा पुढील वर्षात तात्पुरता प्रवेश करावा व नंतर परीक्षा घेण्यात याव्या, असे यात स्पष्ट करण्यात आले आहे.
योगेश पांडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर ‘माफसू’तील (महाराष्ट्र अॅनिमल अॅन्ड फिशरीज सायन्स युनिव्हर्सिटी) परीक्षा व पुढील प्रवेशप्रक्रियेबाबत संभ्रम कायम होता. मात्र अखेर केंद्रीय मत्स्यपालन, पशुपालन व डेअरी मंत्रालयाकडून सूचना जारी करण्यात आल्या आहेत. जर ‘कोरोना’ची स्थिती नियंत्रणात आली नाही तर पहिल्या तीन वर्षांच्या विद्यार्थ्यांचा पुढील वर्षात तात्पुरता प्रवेश करावा व स्थिती पूर्वपदावर झाल्यावर परीक्षा घेण्यात याव्या, असे यात स्पष्ट करण्यात आले आहे. यासंदर्भात ‘माफसू’च्या विद्वत् परिषदेत पुढील निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. ‘लोकमत’ने हा विषय लावून धरला होता हे विशेष.
‘माफसू’मधील अभ्यासक्रम हे भारतीय पशुवैद्यक परिषदेच्या किमान मापदंडांवर आधारित आहे. त्यामुळे परीक्षा प्रणालीत बदल करण्यासाठी परिषदेतर्फे सुधारित दिशानिर्देश जारी झाल्याशिवाय पुढील पावले उचलता येणार नाही. यासंदर्भात देशभरातील विविध विद्यापीठांनी परिषदेला पत्र लिहिले होते. मात्र दिशानिर्देश जारी झाले नसल्याने प्रशासन व विद्यार्थ्यांमधील संभ्रम वाढीस लागला होता.
या पार्श्वभूमीवर मंत्रालयाचे सहसचिव उपमन्यू बसू यांनी संबंधित सूचना जारी केल्या आहेत. पशुवैद्यकीय विद्यापीठे व महाविद्यालये विद्यार्थ्यांचे ‘ऑनलाईन’ वर्ग घेऊ शकतात. शिवाय विद्यार्थ्यांना विविध विषयांचा ‘ई-डाटाबेस’ उपलब्ध करुन देण्यात यावा. सोबतच प्रत्येक वर्गानंतर ‘ऑनलाईन असायनमेंट’ देण्यात यावी. ‘लॉकडाऊन’ आणखी शिथिल झाल्यानंतर प्रात्यक्षिकांचे वर्ग घेण्यात यावे, असे यात स्पष्ट करण्यात आले आहे. ‘एमएसव्हीई’नुसार (मिनिमम स्टँडर्डस् ऑफ व्हेटरनरी एज्युकेशन) सर्व महाविद्यालये ४० टक्के गुणांचे अंतर्गत मूल्यमापन करु शकतात. यासाठी मौखिक परीक्षा, सेमिनार, विविध स्वाध्याय इत्यादींचा आधार घेतला जाऊ शकतो.
‘ऑनलाईन’ परीक्षांचा विचार व्हावा
पशुवैद्यकीय विद्यापीठांनी ‘ऑनलाईन’ परीक्षा घेण्यावरदेखील विचार करावा. तसेच जर विद्यार्थी दुसऱ्या राज्यात अडकले असतील तर मूळ विद्यापीठाच्या विनंतीनंतर संबंधित राज्यातील विद्यापीठ विद्यार्थ्यांच्या परीक्षेची व्यवस्था करु शकते, असेदेखील यात सुचविण्यात आले आहे.
शैक्षणिक कॅलेंडर निश्चित करणार
आम्हाला केंद्रपातळीहून आलेल्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यांच्या सूचनेनुसार अगोदर आम्ही शैक्षणिक कॅलेंडर निश्चित करु. यासोबतच परीक्षा कशा पद्धतीने घेता येईल यासंदर्भात दोन ते तीन दिवसात आराखडा व नियमावली तयार करु. त्यानंतर विद्वत् परिषदेत मंथन झाल्यानंतर वेळापत्रक जाहीर करु अशी माहिती पशुवैद्यकीयशास्त्र अधिष्ठाता व ‘डायरेक्टर ऑफ इन्स्ट्रक्शन्स’ डॉ.ए.पी.सोमकुंवर यांनी दिली.