आपली बस कामगारांना किमान वेतन द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 11:46 PM2018-02-05T23:46:57+5:302018-02-05T23:49:18+5:30
महापालिकेच्या ‘आपली बस’मधील कामगारांना किमान वेतन लागू करून सर्व कामगारांना महापालिकेच्या सेवेत कायम करण्यात यावे, अन्यथा २० फेबुवारीपासून कामगार संपावर जाणार असल्याचा इशारा माजी खासदार व जिल्हा शिवसेना प्रमुख प्रकाश जाधव यांनी दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या ‘आपली बस’मधील कामगारांना किमान वेतन लागू करून सर्व कामगारांना महापालिकेच्या सेवेत कायम करण्यात यावे, अन्यथा २० फेबुवारीपासून कामगार संपावर जाणार असल्याचा इशारा माजी खासदार व जिल्हा शिवसेना प्रमुख प्रकाश जाधव यांनी दिला आहे.
कामगारांच्या मागण्यांसंदर्भात जाधव यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने सोमवारी महापालिका आयुक्त अश्विन मुदगल यांना मागण्यांचे निवेदन देऊ न चर्चा केली. महापालिकेची बससेवा कंत्राट पद्धतीने सुरू आहे. कंत्राटदार बदलला तरी सेवा अखंडित असल्याने कार्यरत कामगारांना बदलण्यात येऊ नये. सर्व कामगारांना सेवेत कायम करण्यात यावे. महापालिका प्रशासनाने जारी केलेल्या पत्रानुसार आपली बससेवेतील कामगारांनाही किमान वेतन लागू करण्यात यावे, अशी मागणी जाधव यांनी केली.
कामगारांना कुठल्याही आरोपाखाली कमी करताना त्यांना आपली बाजू मांडण्याची संधी मिळावी, यासाठी परिवहन विभागात चौकशी विभागाची नियुक्ती करून चौकशी करण्यात यावी. निलंबन कालावधीत उदरनिर्वाह भत्ता लागू करण्यात यावा. वंश निमय कंपनीने १० वर्षांच्या करारावर तिकीट निरीक्षकांना नियुक्त केले आहे. आता त्यांची सेवा खंडित केली जात आहे. हा प्रकार थांबविण्यात यावा. अन्यथा कामगार २० फेब्रुवारीपासून संपावर जातील, असा इशारा जाधव यांनी दिला. कामगारांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले.
शिष्टमंडळात प्रकाश जाधव, संघटनेचे जिल्हा संघटक सुरेश तळवेकर, संघटनेचे अध्यक्ष भाऊ राव रेवतकर, उपाध्यक्ष राज सरोदे, सचिव अंबादास शेंडे, किशोर राऊ त यांच्यासह कामगारांचा समावेश होता.